कुंकळ्ळी येथील वर्ष १५८३ च्या पोर्तुगिजांच्या विरोधातील उठावावर लघुपट काढा ! – कुंकळ्ळी चिफ्टन मेमोरियल ट्रस्ट

पोर्तुगिजांच्या विरोधात लढतांना हुतात्मा झालेल्या कुंकळ्ळीतील १६ महानायकांचे स्मारक

मडगाव, १६ जून (वार्ता.) – कुंकळ्ळी येथील वर्ष १५८३ च्या पोर्तुगिजांच्या विरोधातील उठाव ११ वी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्यानंतर आता या ऐतिहासिक घटनेवर गोवा सरकारने एक लघुपट (डॉक्युमेंटरी) काढावा, अशी मागणी कुंकळ्ळी चिफ्टन मेमोरियल ट्रस्ट यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष ऑस्कर मार्टीन यांनी संबोधित केले, तर त्यांच्यासमवेत ट्रस्टचे सदस्य श्रीपाद देसाई आणि भिकू देसाई यांची उपस्थिती होती.


हा इतिहास वाचा –

पोर्तुगीज राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या विरोधातील कुंकळ्ळीतील संघर्ष !
https://sanatanprabhat.org/marathi/442664.html


ट्रस्टचे अध्यक्ष ऑस्कर मार्टीन यांनी पुढील सूत्रे मांडली –

१. वर्ष १५८३ च्या पोर्तुगिजांच्या विरोधातील उठावावर लघुपट काढल्यास जगभरातील इतिहासतज्ञांना याचा लाभ होईल आणि त्यांना यावर अधिक संशोधन करण्यास साहाय्य होईल.

(सौजन्य : Goa 365 TV) 

२. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कुंकळ्ळी येथील उठाव पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याचे धाडस करणारे गोवा मुक्तीनंतरचे पहिले मुख्यमंत्री आहेत. पाठ्यपुस्तकात धडा समाविष्ट केल्याविषयी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये आणि धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी उत्तरदायी असलेला संपूर्ण गट यांचे ट्रस्ट आभार मानते.

३. वर्ष १५८३ च्या कुंकळ्ळीच्या उठावाला गोव्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा उठाव पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा सांस्कृतिक वारसा कसा जपावा, हे पूर्वी कुंकळ्ळीवासियांनी दिलेल्या लढ्यातून शिकायला मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच मिळणार नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये अभिमान जागृत होणार आहे. आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्य आणि न्याय मिळवण्यासाठी केलेल्या त्यागाची त्यांना माहिती मिळेल. उठावाची माहिती पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्याने याचा लाभ येणार्‍या अनेक पिढ्यांवर होणार आहे.

४. सरकारने कुंकळ्ळी नगरपालिकेच्या जवळ असलेले १६ महानायकांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करावे.

Cuncolim Revolt – 15th July 1583 A.D.

 (सौजन्य : Prudent Media Goa)