सोलापूर विमानसेवेसाठी अडसर ठरणारी सिद्धेश्‍वर साखर कारखान्‍याची चिमणी पाडली ! 

सोलापूर विमानसेवेसाठी अडसर ठरणारी सिद्धेश्‍वर साखर कारखान्‍याची चिमणी पाडली

सोलापूर – येथील होटगी रस्‍त्‍यावरील विमानसेवेला अडसर ठरणारी श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्‍याची चिमणी १५ जून या दिवशी पाडण्‍यात आली. १३ जून ते १८ जून या कालावधीत कारखान्‍याच्‍या १ किलोमीटर परिसरात १४४ कलमान्‍वये अत्‍यावश्‍यक सेवा वगळता कोणत्‍याही व्‍यक्‍तीस फिरण्‍यास प्रतिबंध केला होता; मात्र हे निर्बंध १५ जूनला शिथिल केले आहेत. महापालिका आयुक्‍त शीतल तेली उगले आणि पोलीस आयुक्‍त राजेंद्र माने हे अधिकारी चिमणी पाडकाम होईपर्यंत सिद्धेश्‍वर साखर कारखान्‍याच्‍या परिसरात प्रत्‍यक्ष उपस्‍थित होते. मागील अनेक वर्षांपासून सिद्धेश्‍वर साखर कारखान्‍याची चिमणी पाडण्‍याची मागणी होत होती. ‘सोलापूर विकास मंच’ने मागील अनेक दिवस यासाठी उपोषण केले होते. सर्वोच्‍च न्‍यायालयाने चिमणी पाडण्‍याचे आदेश दिल्‍यानंतर सोलापूर महानगरपालिकेने कार्यवाही चालू केली होती. चिमणी पाडल्‍यानंतर शहराची नागरी विमानसेवा लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी सोलापूरवासियांमधून जोर धरू लागली आहे.