शासनाचे माझी वसुंधरा अभियान !
रत्नागिरी – देशपातळीवर स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत नाव मिळवलेल्या रत्नागिरी नगर परिषदेने कोकण विभागात पुन्हा चांगली कामगिरी केली आहे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ३.० च्या अंतर्गत ५० सहस्र ते १ लाख लोकसंख्येच्या संवर्गामध्ये नगर परिषदेने विभागीय स्तरावर पहिला क्रमांक पटकावला असून पर्यावरणदिनी नगर परिषदेला १ कोटी ५० लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे, असे वृत्त दैनिक खबरदार संकेतस्थळाने दिले आहे.
पंचतत्त्व या विभागात वर्षभरात केलेल्या कामगिरीचा हा सन्मान असून मुख्याधिकारी तुषार बाबर, माने, चाळके यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी झोकून देऊन काम केल्याचे हे फलित होय.
शासनाकडून गेल्या वर्षी माझी वसुंधरा अभियान ३.० राबवण्यात आले. या अभियानामध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वअंतर्गत केलेल्या कामाचे मूल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, वृक्ष लागवड, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन यासाठी शहरात ४ ‘पॉईंट’ ठेवण्यात आले. सोलर पॅनेल, वृक्षगणना, मोठ्या खोडाच्या झाडांना टॅग लावणे, हरित विभाग तयार करून ‘सेल्फि पॉइंट’ तयार केले. शहरात नवीन इमारतींना अनुमती देतांना पावसाच्या पाण्याची साठवण (रेनवॉटर हार्वेस्टिंग) बंधनकारक केले. पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त दिवाळीचेही आवाहन करण्यात आले. नगर परिषदेने केलेल्या या कामगिरीमुळेच विभाग स्तरावर तिला पारितोषिक देण्यात आले.