अपचन – एक दुर्लक्षित आजार

अजीर्ण किंवा अपचन हे सर्वांच्‍या परिचयाचे आहे; परंतु या आजाराकडे क्षुल्लक म्‍हणून दुर्लक्ष केले जाते. आयुर्वेदामध्‍ये पचनशक्‍तीतील बिघाड हे अनेक आजारांचे मूलभूत कारण ठरते. म्‍हणून त्‍याविषयी आपण आजच्‍या लेखामध्‍ये सविस्‍तर जाणून घेणार आहोत. अपचन होण्‍यास आपण स्‍वतः उत्तरदायी असतो. जिभेवर ताबा नसणे, हे अपचनाचे मुख्‍य कारण आहे.

१. अपचन होण्‍यामागील मुख्‍य कारणे

वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर

अ. पचण्‍यास जड (श्रीखंड, बासुंदी, चीज, पिझ्‍झा, बर्गर, चिकन, मटण), अतीतेलकट तूपकट पदार्थ, अतीथंड शीतपेय, आईस्‍क्रीम हे पदार्थ सतत खाणे.

आ. भूक लागलेली नसतांनाही पुन्‍हा खाणे.

इ. शिळे अन्‍न खाणे.

ई. अतीप्रमाणात पाणी पिणे.

उ. केळी, दूध, फळे, सॅलड असे पदार्थ सतत खाणे.

ऊ. अतीश्रम किंवा सतत बैठे काम करणे.

ए. दिवसा झोपणे

ऐ. रात्रीचे जागरण करणे.

ओ. मलमूत्र यांच्‍या संवेदना दडपून टाकणे

औ. राग, भय, ईर्ष्‍या इत्‍यादी मानस दोषांमुळे अन्‍नपचन होऊ शकत नाही.

वरील कारणांचा आपण अभ्‍यास केल्‍यास आणि ही कारणे टाळली, तर आपण स्‍वतःची पचनक्षमता सुधारण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्न करू शकतो.

२. अपचन झाल्‍याची लक्षणे

अपचन झाल्‍याची लक्षणे काय आहेत, ते येथे देत आहे.

अ. पोट दुखणे, पोट फुगणे, करपट ढेकर, मळमळ, दुर्गंधीयुक्‍त वात सरणे, जुलाब होणे किंवा शौचास साफ न होणे, तोंडाला चव नसणे, अन्‍नावर वासना नसणे.

आ. शरीर गळून जाणे किंवा जवळ होणे, श्रम न करताही थकवा येणे, डोके दुखणे.

इ. पित्तामुळे अजीर्ण झाल्‍यास अधिक तहान लागणे, छातीत जळजळ, पोटात आग, आंबट ढेकर अशी लक्षणेही दिसू शकतात.ई. शरिराला जडपणा येणे, तोंडास पाणी सुटणे, डोळ्‍यांभोवती सूज येणे ही लक्षणेही अपचनामुळे दिसू शकतात.

वरील लक्षणे प्रत्‍येकाने कधीतरी अनुभवलेली असणारच आहेत; कारण जिभेवर ताबा ठेवणारे लोक सध्‍या क्‍वचित्‌च बघायला मिळतात. जोपर्यंत काही आजार होत नाही, तोपर्यंत आपण जागे होत नाही, ही सध्‍याची प्रवृत्ती दिसून येते. ‘भूक नसतांना आवडीचे पदार्थ समोर आले, तर त्‍याला नकार कसा देणार ? आता सर्वजण आग्रह करत आहेत, तर खाल्लेच पाहिजे’, अशी एक ना अनेक कारणांमुळे आपण अपचनासारखे विकार ओढवून घेत असतो. तेव्‍हा सर्वांनीच याचा गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे. आपण ग्रहण केलेल्‍या आहाराचे सुयोग्‍य पचन होणे, ही आरोग्‍याची पहिली पायरी आहे.

३. अपचनावर करावयाचे घरगुती उपचार

आता आपण अपचनावर घरगुती उपचार बघणार आहोत. हे उपचार समजून घेण्‍यापूर्वी एक सूत्र महत्त्वाचे म्‍हणजे की, ‘आता अपचनावरचा उपाय मिळाला आहे, तर काहीही खा आणि हे उपचार करा म्‍हणजे अपचन होणार नाही’, असा अर्थ येथे घेणे अपेक्षित नाही. कधीतरी नियम मोडला गेला आणि अपचन झाले, तरच आपण हे उपाय केले पाहिजेत. सर्वांचा कल अपचन होणारच नाही, याकडेच असायला हवा. तसेच अपचनाचा आजार दीर्घकाळापर्यंत चालूच असेल, तर वैद्यांच्‍या सल्‍ल्‍याने योग्‍य तो औषधोपचार करवून घ्‍यावा. त्‍या वेळी घरगुती उपचार करण्‍यात वेळ दवडू नये.

अ. ‘लंघन करणे म्‍हणजे उपवास करणे’, हा अजीर्णवरील पहिला आणि रामबाण उपाय आहे. कडकडीत भूक लागेपर्यंत काहीही खाऊ नये. तहान लागल्‍यास मध्‍ये मध्‍ये फक्‍त कोमट पाणी प्‍यावे.

आ. अतीपाणी पिण्‍याचे टाळावे. तहान लागल्‍यास गटागट पाणी पिण्‍यापेक्षा एक-एक घोट पाणी प्‍यावे.

इ. हिंग आणि लसूण घातलेले ताक प्‍यावे.

ई. पुदिन्‍याची चटणी खावी.

उ. मिठामध्‍ये शेंदेलोण किंवा काळे मीठ वापरावे.

ऊ. फ्‍लॉवर, बटाटे, रताळी अशा भाज्‍या टाळाव्‍यात. घोसावळ्‍याची किंवा शेपूची भाजी खावी.

ए. हरभरा, वाटाणा, पावटा, मटकी, छोले यांसारखी कडधान्‍ये कटाक्षाने टाळावीत. त्‍याऐवजी मुगाचे कढण किंवा पालेभाज्‍यांचे सूप घ्‍यावे.

ऐ. भूक लागत नसल्‍यास संत्री, मोसंबी, पपई, डाळिंब या फळांचा आहारात समावेश करावा.

ओ. पराठा, नान, घडीच्‍या चपात्‍या याऐवजी तांदळाची अथवा ज्‍वारीची भाकरी खावी.

औ. तोंडात चव नसल्‍यास आमसुलाचे सार आणि भात जेवावे.

अं. पोटातील गॅस (वायू) न्‍यून करण्‍यासाठी जेवणानंतर आवळा आणि सुंठ यांचे एकत्रित चूर्ण चिमूटभर घ्‍यावे.

क. काही जणांना कडकडून भूकच लागत नाही. त्‍यासाठी त्‍यांनी रामनवमीला प्रसाद म्‍हणून जो सुंठवडा सिद्ध करतात, तो अर्धा चमचा दिवसातून ३ वेळा आणि ४ ते ५ दिवस घ्‍यावा.

ख. पोटातील वायूमुळे पोट दुखत असल्‍यास अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर मीठ एक कपभर कोमट पाण्‍यासह घ्‍यावे.

ग. तोंडाला चव नसतांना आल्‍याचे बारीक तुकडे, लिंबू रस, शेंदेलोण आणि काळे मीठ एकत्र करून काचेच्‍या बरणीत भरून ठेवावे. दिवसभरात अधूनमधून २-३ वेळा हे चाटण घ्‍यावे. यामुळे भूक लागते आणि अन्‍न पचते.

– वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर, पुणे. (४.६.२०२३)