सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवासाठी महर्षींच्‍या आज्ञेप्रमाणे बनवलेल्‍या दिव्‍य रथाच्‍या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्‍ट्ये !

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने त्‍यांचा ब्रह्मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. या सोहळ्‍यात सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले काष्‍ठापासून बनवलेल्‍या सुवर्ण रंगाच्‍या दिव्‍य रथात विराजमान झाले होते. तो रथ इतका सुंदर, दिव्‍य आणि नयनमनोहारी आहे की, ‘त्‍याकडे पहातच रहावे’, असे सर्वांना वाटत होते. देवतालोकाची अनुभूती देणारा हा रथ हा आता सनातनचा अनमोल ठेवा आहे. सप्‍तर्षींची अखंड कृपा, शिवमोग्‍गा (कर्नाटक) येथील सुप्रसिद्ध पंचशिल्‍पकार पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी यांचे अनमोल मार्गदर्शन आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अलौकिक शिकवण यांमुळे हा दिव्‍य रथ साकार झाला आहे. हा रथ पुढील शेकडो वर्षे श्रीमन्‍नारायणस्‍वरूप गुरुदेवांची महती अनेक पिढ्यांपर्यंत पोचवेल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘या दिव्‍य रथाच्‍या निर्मितीची प्रक्रिया आणि त्‍याची वैशिष्‍ट्ये, तसेच साधकांना सेवा करतांना आलेल्‍या अडचणी, त्‍या अडचणींवर गुरुकृपेने केलेली मात अन् त्‍यांना आलेल्‍या बुद्धीअगम्‍य अनुभूती’ पुढे दिल्‍या आहेत. हा लेख वाचून साधकांच्‍या डोळ्‍यांसमोर या दिव्‍य रथाच्‍या निर्मितीच्‍या प्रक्रियेचे जणू चलचित्र झळकेल आणि साधकांना भावसागरात डुंबल्‍याची अनुभूती येईल. ६ जून या दिवशी आपण रथ बनवण्‍याची पूर्वसिद्धता आणि रथासाठीच्‍या लाकडाचा अभ्‍यास अन् लाकूड मिळण्‍याची प्रक्रिया पाहिली. आज त्‍यापुढील भाग पाहूया. 

‘या लेखाच्‍या माध्‍यमातून साधकांची महर्षि, परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्‍ण यांच्‍यावरील श्रद्धा वृद्धींगत होवो’, अशी श्रीकृष्‍णाच्‍या चरणी प्रार्थना !

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/689450.html


३. रथासाठीच्‍या लाकडाचा अभ्‍यास आणि लाकूड मिळण्‍याची प्रक्रिया

३ आ. रथासाठी लाकूड मिळवणे

३ आ ४. या सेवेच्‍या संदर्भात पू. रमानंदअण्‍णांनी (सनातनचे ७५ वे (समष्‍टी) संत पू. रमानंद गौडा यांनी) आम्‍हाला पुष्‍कळ साहाय्‍य केले.

३ आ ५. एवढे लांब लाकूड आता मिळत नाही. आम्‍हाला जितके लांब आणि रुंद लाकूड हवे होते, त्‍यापेक्षा मिळालेले लाकूड थोडे अधिकच लांब अन् रुंदही होते.

पू. रमानंद गौडा

३ आ ६. लाकूड विकणार्‍यांनी साधकांना अपेक्षित असलेल्‍या लाकडाचा अभ्‍यास करून एक लाकूड शोधणे आणि त्‍याच्‍या सकारात्‍मक ऊर्जेची प्रभावळ सर्वांत अधिक असणे : लाकूड कापल्‍यावर मी त्‍यांना सांगितले, ‘‘त्‍याचे ‘ग्रेन्‍स’ (लाकडाच्‍या नसा) चांगले वाटत नाही. दुसरे कापूया.’’ तेव्‍हा त्‍यांना वाटले, ‘यांना काही वेगळे हवे आहे.’ आम्‍ही त्‍यांना सांगितले, ‘‘लाकूड कापल्‍यावर त्‍याचे ग्रेन्‍स सरळ असायला हवेत.’’ त्‍यांनी रात्री अभ्‍यास करून दुसर्‍या दिवशी आम्‍हाला एक लाकूड दाखवले आणि म्‍हणाले, ‘‘हे लाकूड तुम्‍हाला हवे तसे आहे.’’ त्‍यांनी आम्‍हाला पुष्‍कळ चांगला प्रतिसाद दिला. सर्व लाकडांमध्‍ये या पूर्ण लाकडाची प्रभावळ सर्वाधिक सकारात्‍मक आहे. त्‍याची प्रभावळ २५ मीटर आहे.

३ आ ७. रथाच्‍या पायाकडील दर्शनी भागासाठीचे लाकूड कापतांना अनेक अडचणी येणे आणि लाकूड अन् लाकूड कापायचे यंत्र यांची दृष्‍ट काढल्‍यावर लाकूड सहजतेने कापता येणे : रथाच्‍या पायाकडील दर्शनी भागासाठीचे लाकूड कापल्‍यावर त्‍यातून २४ इंचाची पूर्ण फळी निघाली; मात्र हे लाकूड कापायला पुष्‍कळ त्रास झाला. बाकी सर्व लाकडाच्‍या दिवसाला २ – २ फळ्‍या कापून व्‍हायच्‍या; पण हे लाकूड कापतांना पुष्‍कळ त्रास झाला. हे लाकूड कापले जात नव्‍हते. लाकूड कापणारे अन्‍य पंथीय होते; पण त्‍यांचेही चांगले सहकार्य लाभले. लाकूड कापणार्‍यांनी आम्‍हाला त्‍यांना येणार्‍या अडचणी सांगितल्‍या. ते म्‍हणाले, ‘‘लाकूड कापले जात नाही.’’ तेव्‍हा मी तिथे जाऊन उदबत्तीने ते लाकूड आणि लाकूड कापण्‍याचे यंत्र यांची दृष्‍ट काढली. कापूर लावला. आध्‍यात्मिक स्‍तरावरील सगळे उपाय केले. त्‍यानंतर आम्‍ही जेवायला गेलो. लाकूड कापणारा एकटाच मुलगा तिथे थांबला होता. दुपारी आम्‍ही जेवायला गेलो, तोपर्यंत एकही फळी कापली गेली नव्‍हती. जेवून आल्‍यावर आम्‍ही पाहिले, तर त्‍याने दोन फळ्‍या कापल्‍या होत्‍या. मी त्‍याला विचारले, ‘‘दोन फळ्‍या कशा कापल्‍या ?’’ तेव्‍हा त्‍याने सांगितले, ‘‘तुम्‍ही दृष्‍ट काढल्‍यावर यंत्र चालू झाले. यंत्राला अडचण येत होती. सकाळपासून त्‍याला दृष्‍ट लागली होती. त्‍यामुळे लाकूड कापले जात नव्‍हते.’’ दृष्‍ट काढल्‍यानंतर नंतर त्‍याने एका ब्‍लेडमध्‍ये दोन फळ्‍या कापल्‍या होत्‍या. सकाळी अडचणी येत असतांना लाकूड कापण्‍यासाठी ४ – ५ ब्‍लेड्‌स पालटावी लागली. अशा प्रकारे दिवसभरात लाकूड कापण्‍यासाठी एकूण ८ ब्‍लेड्‌स पालटावी लागली. एरव्‍ही एवढे लाकूड कापण्‍यासाठी ४ ब्‍लेड्‌स लागायला हवी होती. शेवटी संध्‍याकाळपर्यंत सगळे लाकूड कापले गेले. अर्ध्‍या दिवसाची सेवा करण्‍यासाठी पूर्ण दिवस लागला. त्‍यात आपल्‍याला ज्‍या मुख्‍य ४ फळ्‍या हव्‍या होत्‍या, त्‍या चांगल्‍या मिळाल्‍या.’

– श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

रथासाठी अखंड लाकूड मिळण्‍याविषयी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेली सूत्रे

१. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : ‘कुठल्‍याही गोष्‍टीचा पाया मजबूत आणि चैतन्‍यदायी असेल, तर त्‍याचे फळ निश्‍चितच चांगले मिळते. रथाच्‍या पायाबांधणीसाठी अखंड लाकूड मिळाले. ‘अखंडतेत अधिक चैतन्‍य टिकून रहाते’, या नियमाप्रमाणे अखंड लाकडाच्‍या पायावर केली जाणारी रथाची रचना अधिक चैतन्‍यदायी असणार.’

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : ‘याच लाकडाची सकारात्‍मक प्रभावळ पुष्‍कळ होती. त्‍याच्‍यावरच आक्रमण झाले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.५.२०२३)

(क्रमशः)


रथाच्‍या लाकडाविषयी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे

१. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१ अ. ‘काही वृक्ष मानवानेच लावलेले असतात; पण हे वृक्ष जंगलात ईश्‍वराच्‍या इच्‍छेनेच आले आहेत.

१ आ. लाकडांच्‍या नमुन्‍यांचे ‘युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर’ने परीक्षण करून रथासाठी ‘दांडेली टीक वूड (सागवान)’ आणि चाकांसाठी ‘गोज्‍जल’ नावाचे लाकूड वापरण्‍याचे अंतिम करणे : साधकांनी सागवानाच्‍या लाकडाचे ७ – ८ नमुने आणि जंगली लाकडाचे २ – ३ नमुने यांच्‍या सकारात्‍मक अन् नकारात्‍मक प्रभावळीचे ‘युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर’ने (UAS) (टीप १) परीक्षण केले. तेव्‍हा ‘दांडेली सागवान (टीक वूड)’ या प्रकारच्‍या लाकडामध्‍ये सर्वाधिक सकारात्‍मक ऊर्जा आढळली. ‘बर्मा सागवान (टीक वूड)’ या प्रकारचे सागवान दिसायला पुष्‍कळ सुंदर होते; परंतु ते विदेशी जातीचे होते आणि त्‍यात सकारात्‍मक ऊर्जा आढळली नाही. त्‍यामुळे ‘दांडेली टीक वूड’पेक्षा ‘बर्मा टीक वूड’ दिसायला चांगले असूनही आपण घेतले नाही. ‘दांडेली सागवाना’चे वैशिष्‍ट्य, म्‍हणजे त्‍याला एक विशिष्‍ट प्रकारचा सुगंधही असतो.

अशा प्रकारे टिकाऊपणा आणि लाकडामध्‍ये असलेली सकारात्‍मक ऊर्जा यांच्‍या आधारे गुरुदेवांच्‍या रथासाठीचे लाकूड अंतिम झाले. रथाची चाके आणि रथाचा भार उचलणारी खालची फळी यांसाठी ‘गोज्‍जल’ या प्रकारचे जंगली लाकूड अंतिम झाले.

टीप १ – यू.ए.एस्. (UAS) या उपकरणाद्वारे वस्‍तू, वास्‍तू किंवा व्‍यक्‍ती यांच्‍यातील सकारात्‍मक किंवा नकारात्‍मक ऊर्जेची प्रभावळ मोजता येते.

१५.७.२०२२ या दिवशी आपण पूजन केलेले लाकूडही सप्‍तर्षींनी रथासाठी वापरण्‍यास सांगितले होते. ते लाकूड सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या सिंहासनासाठी वापरले.’

२. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ 

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

अ. ‘हे वृक्ष स्‍वतःहून पडले, म्‍हणजे ईश्‍वराने पाडले. आयुर्वेदाच्‍या जाणकारांनी सांगितले, ‘वृक्षाला भावना असतात. तो वृक्ष पाडतांना त्‍यालाही कष्‍ट (त्रास) होतात आणि त्‍या कष्‍टांची स्‍पंदने त्‍याच्‍या लाकडात येतात; पण जे वृक्ष ईश्‍वराने पाडले आहेत, त्‍यांचे आयुष्‍य पूर्ण झालेले असल्‍यामुळे त्‍या वृक्षांच्‍या लाकडात चैतन्‍य अधिक असते.’

पूर्वी भारतावर राज्‍य करत असतांना इंग्रजांनी कर्नाटकमधील ‘दांडेली’ या गावातील सागवानाची मोठी झाडे तोडून ते लाकूड इंग्‍लंडमध्‍ये नेणे आणि ‘कोड’ वापरून त्‍याच्‍या लाकडी वस्‍तू बनवणे

श्री. प्रकाश सुतार

इंग्रज भारतावर राज्‍य करत होते. त्‍या वेळी कर्नाटकातील दांडेली या गावात ‘सागवाना’ची झाडे पुष्‍कळ होती. भारतात असतांनाच त्‍यांनी सागवानाच्‍या लाकडांविषयी अभ्‍यास केला आणि आपल्‍याकडील लाकूडरूपी अमूल्‍य धन त्‍यांनी त्‍यांच्‍या देशात नेले. तिथे त्‍यांनी ‘कोड’ वापरून त्‍या लाकडापासून वस्‍तू बनवल्‍या. त्‍या अजूनही टिकून आहेत. त्‍यांच्‍या देशात असे लाकूड मिळत नाही.’

– श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/690078.html