सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !

सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले काष्ठापासून बनवलेल्या सुवर्ण रंगाच्या दिव्य रथात विराजमान झाले होते. तो रथ इतका सुंदर, दिव्य आणि नयनमनोहारी आहे की, ‘त्याकडे पहातच रहावे’, असे सर्वांना वाटत होते. देवतालोकाची अनुभूती देणारा हा रथ हा आता सनातनचा अनमोल ठेवा आहे. सप्तर्षींची अखंड कृपा, शिवमोग्गा (कर्नाटक) येथील सुप्रसिद्ध पंचशिल्पकार पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी यांचे अनमोल मार्गदर्शन आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अलौकिक शिकवण यांमुळे हा दिव्य रथ साकार झाला आहे. हा रथ पुढील शेकडो वर्षे श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांची महती अनेक पिढ्यांपर्यंत पोचवेल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि त्याची वैशिष्ट्ये, तसेच साधकांना सेवा करतांना आलेल्या अडचणी, त्या अडचणींवर गुरुकृपेने केलेली मात अन् त्यांना आलेल्या बुद्धीअगम्य अनुभूती’ पुढे दिल्या आहेत. हा लेख वाचून साधकांच्या डोळ्यांसमोर या दिव्य रथाच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे जणू चलचित्र झळकेल आणि साधकांना भावसागरात डुंबल्याची अनुभूती येईल.

‘या लेखाच्या माध्यमातून साधकांची महर्षि, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावरील श्रद्धा वृद्धींगत होवो’, अशी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ! 

(भाग १)

१. असा झाला रथ बनवण्याच्या पूर्वसिद्धतेला आरंभ !

कु. अंजली क्षीरसागर

१ अ. सप्तर्षींनी ‘वर्ष २०२३ मध्ये प.पू. गुरुदेवांचा रथोत्सव साजरा करायचा असून त्यासाठी लाकडाचा रथ बनवायचा आहे’, असे सांगणे आणि त्यानुसार रथ बनवण्याच्या पूर्वसिद्धतेला आरंभ करण्यात येणे : ‘वर्ष २०२२ मधील रथोत्सव झाल्यानंतर सप्तर्षींनी सांगितले, ‘पुढील वर्षीही गुरुदेवांचा रथोत्सव साजरा करायचा आहे; परंतु हा रथ काष्ठाचा (लाकडी) असावा आणि तो साधकांनी ओढावा.’ १.७.२०२२ या दिवसापासून सप्तर्षींच्या आज्ञेनुसार वर्ष २०२३ मधील रथोत्सवाच्या पूर्वसिद्धतेला आरंभ करण्यात आला. १५.७.२०२२ या दिवशी काष्ठापासून बनवायच्या रथाच्या काष्ठाचे (लाकडाचे) प्रातिनिधिक स्वरूपात पूजन करण्यात आले.

१ आ. साधकांनी विविध देवस्थानांमधील रथांचा अभ्यास करणे आणि रथशिल्पींची भेट घेऊन त्यांच्याकडून रथशास्त्राविषयी जाणून घेणे : रथासाठीच्या काष्ठाचे पूजन झाल्यानंतर ‘विविध देवस्थानांमध्ये देवतांचे रथ कसे असतात ?’, या संदर्भात अभ्यास चालू झाला. श्री. गौतम गडेकर, आश्रमात सुतारकलेच्या संदर्भात सेवा करणारे श्री. प्रकाश सुतार आणि श्री. रामदास कोकाटे, चित्रीकरणाची सेवा करणारे काही साधक, तसेच कलेच्या संदर्भात सेवा करणार्‍या सौ. जान्हवी रमेश शिंदे, श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि मी (कु. अंजली क्षीरसागर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)), असे आम्ही काही साधक ‘रथ कसा बनवावा ?’, या संदर्भात अभ्यास करत होतो. त्यासाठी आम्ही विविध मंदिरांतील रथांचा अभ्यास केला, तसेच आमच्यापैकी काही जणांनी ९ रथशिल्पींच्या भेटी घेतल्या. ‘त्यांच्याकडून रथ कसा बनवतात ? त्यासाठी काय अभ्यास करावा लागतो ?’, हे जाणून घेतले. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आपल्याला प्रत्येकच कृती शास्त्रानुसार आणि परिपूर्ण करण्याची शिकवण दिली आहे. त्यामुळेच हा अभ्यास करतांना ‘श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव या रथात विराजमान होणार असल्याने तो रथ तितकाच शास्त्रशुद्ध आणि दिव्य असायला हवा’, असे साधकांना वाटत होते.’

– कु. अंजली क्षीरसागर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ इ. प्रारंभी ‘रथ बनवण्याची सेवा बाहेरील कुशल कारागिराकडून करून घ्यायची आहे’, असे वाटणे : ‘प्रारंभी ऑगस्ट २०२२ मध्ये ‘आपल्याला रथ बनवायची सेवा चालू करायची आहे’, असा निरोप मिळाल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘आपण बाहेरून विशेष कारागिरांकडून रथ बनवून घ्यायचा आहे.’ यासाठी आम्ही कर्नाटक आणि गोवा या राज्यांमधील, विशेषकरून कर्नाटकातील रथशिल्पींना भेटण्याचे नियोजन करून त्यांना भेटायला गेलो. आम्ही उडुपी आणि कुमठा येथील रथशिल्पींना भेटलो.

१ ई. श्री. राजशेखर या शिल्पकारांना भेटल्यावर त्यांनी ‘तुम्हीच ही सेवा करू शकता, तुम्हाला जे कारागीर लागतील, ते आम्ही देऊ’, असे सांगणे : या कालावधीत आम्ही श्री. राजशेखर या शिल्पकारांना भेटायला गेलो. सगळा विषय समजून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. शेवटी त्यांना ‘मी सुतारकाम करतो’, हे कळले. तेव्हा ते लगेच म्हणाले, ‘‘ही सेवा तुम्हीच केली, तर अधिक चांगले होईल. तुम्हाला जे साहाय्य लागेल, ते आम्ही करू शकतो. तुम्हाला जे कारागीर लागतील, ते आम्ही देऊ.’’ त्यांच्या या बोलण्यामुळे ‘आपण ही सेवा आणखी चांगली करू’, असा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला.

२. पंचशिल्पकार पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी यांची भेट होऊन त्यांनी साधकांना रथनिर्मितीविषयी मार्गदर्शन करणे

या कालावधीत आम्हाला ‘शिवमोग्गा (कर्नाटक) येथील पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी पंचशिल्पकार असून रथही बनवतात’, असे कळले. साधारण १०.९.२०२२ या दिवशी आम्ही पू. कवटेकरगुरुजींकडे गेलो आणि त्यांना भेटून आमची संकल्पना अन् रथाचा काढलेला नकाशा दाखवला.

पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी यांनी रथनिर्मितीच्या सेवेत अनमोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच श्रीगुरूंसाठी हा दिव्य रथ बनवता आला.

३. रथासाठीच्या लाकडाचा अभ्यास आणि लाकूड मिळण्याची प्रक्रिया

श्री. प्रकाश सुतार

३ अ. ‘रथासाठी कुठल्या प्रकारचे लाकूड वापरायचे ?’, याचा अभ्यास करणे : ‘रथाचा आराखडा अंतिम झाल्यानंतर ‘रथासाठी कुठल्या प्रकारचे लाकूड वापरायचे ?’, याचा अभ्यास चालू झाला. श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त होणारा रथोत्सव हा सनातनचा अनमोल इतिहास आहे.

‘श्री गुरूंची महती सांगणारा हा रथ पुढील अनेक पिढ्यांना पहाता यावा’, यासाठी अधिकाधिक टिकाऊ आणि चांगल्या प्रतीच्या लाकडापासून बनवायला हवा. ते लाकूड कुठे मिळेल ?’, याचा अभ्यास साधक करू लागले. लाकडाचा अभ्यास करतांना ‘सागवान हे सर्वांत चांगल्या प्रतीचे लाकूड आहे; परंतु रथाची चाके आणि रथाचा भार उचलणारी खालची फळी यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे जंगली लाकूड लागते’, हे अभ्यासाअंती कळले.

३ आ. रथासाठी लाकूड मिळवणे

३ आ १. रथासाठी वर्षानुवर्षे टिकणारे लाकूड हवे असणे, शोधूनही ते न मिळणे आणि ते मिळण्यासाठी देवाला शरण जाऊन प्रार्थना करणे : गुरुदेवांसाठी रथ बनवायच्या सेवेला प्रारंभ करतांना आम्ही रथासाठी लाकूड शोधायला आरंभ केला; मात्र पूर्ण गोव्यात आम्हाला अपेक्षित असे लाकूड मिळाले नाही. आम्ही कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांतही लाकूड शोधले. आम्हाला रथासाठी ‘वर्षानुवर्षे टिकेल’, असे लाकूड हवे होते; पण आमचाही अशा लाकडाचा अभ्यास नव्हता. आम्ही देवाला प्रार्थना केली, ‘गुरुदेवांचा रथ बनवण्यासाठी अपेक्षित असे लाकूड आम्हाला मिळू दे. आम्हाला त्या लाकडापर्यंत पोचता येऊ दे.’

३ आ २. कर्नाटकातील ‘कुमठा’ या गावाजवळ लाकूड कापण्याचा कारखाना असल्याचे समजणे आणि तिथे गेल्यावर रथासाठी अपेक्षित असे लाकूड मिळणे : आम्ही लाकूड शोधण्यासाठी कर्नाटकात गेलो होतो. तिथेही शेवटपर्यंत आम्हाला हवे तसे लाकूड मिळाले नाही. शेवटच्या दिवशी संध्याकाळी आम्ही कुमठ्याजवळ हलणावळ येथे पोचलो. तिथे आम्ही चहा घेतला आणि एक प्रयत्न म्हणून चहावाल्या दादांना विचारले, ‘‘इथे जवळपास कुठे चांगल्या प्रतीचे सागवानाचे लाकूड मिळेल का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘इथे बाजूला ‘हल्याळ’ या गावात लाकूड कापायचा कारखाना आहे. तुम्ही तिथे विचारा.’’

चहावाल्या दादांनी सांगितलेल्या ठिकाणी आम्ही गेलो. तेव्हा तेथे बाहेर लाकडाचे मोठे ओंडके पाहून आम्हाला आनंद झाला. आम्ही सकाळपासून गुरुदेवांना केलेल्या प्रार्थना फळाला येऊन त्यांना अपेक्षित अशा लाकडापर्यंत आम्ही पोचलो. आम्ही त्यांना विचारले, ‘‘हे लाकूड किती वर्षांपूर्वीचे आहे ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘पुष्कळ जुने लाकूड आहे. इतके मोठे लाकूड आता कुठेच मिळत नाही. ते केवळ आमच्याकडेच मिळते.’’ ते लाकूड पाहून ‘ते दैवी आहे’, असे आम्हाला वाटले. ईश्वराच्या कृपेमुळे जणू ‘ते लाकूड आमच्यासाठीच ठेवले होते’, असे आम्हाला वाटले.

३ आ ३. रथासाठी मिळालेल्या लाकडाची वैशिष्ट्ये

अ. हे लाकूड १५० ते २०० वर्षांपूर्वीचे आहे.

आ. ‘जे वृक्ष जंगलात स्वतःहून उगवतात, स्वतःहून वाढून मोठे होतात आणि त्यांचे जीवन पूर्ण झाल्यावर आपोआपच पडतात’, अशा वृक्षांचे हे लाकूड आहे. ते वृक्ष कापलेले नाहीत. ते पाडण्यासाठी शस्त्राचा वापर केलेला नाही.

इ. हे वृक्ष पडल्यावर वनात (जंगलात) तसेच पडून रहातात. नंतर वनाधिकारी येऊन ते जमा करतात आणि मग त्यांचा लिलाव होऊन लोक ते घेतात. त्यांच्याकडे लाकडाची पूर्ण नोंदणी (Record) केलेली असते. त्यावरून आपल्याला ‘ते लाकूड किती वर्षांपूर्वीचे आहे ?’, ते समजते. ते लोक ‘बॅच’ (तपशील लिहिलेला कागद) दाखवतात. वनाधिकार्‍यांकडे त्याचा सर्व तपशील (details) लिहिलेला असतो. याविषयी कुणीही त्यांच्या संकेतस्थळावर (साईटवर) पाहून निश्चिती करू शकतात.

ई. या लाकडामध्ये तेलाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याची अधिक काळ टिकण्याची क्षमता आहे. त्याच्यापासून रथ बनवला, तर तो १०० ते २०० वर्षे टिकू शकतो.

उ. या लाकडाचे एकूण वजन साडेचार टन आहे.

ऊ. असे लाकूड कर्नाटकमधील ‘दांडेली’ या ठिकाणीच मिळते.

– श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.५.२०२३)

(क्रमशः)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/689690.html