भविष्यात स्टार्टअपसाठी जागतिक स्तरावर अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी जी-२० राष्ट्रे संघटित

गोव्यात जी-२०च्या स्टार्टअप-२० प्रतिबद्धता गटाची तिसरी बैठक

(स्टार्टअप म्हणजे नवीन औद्योगिक आस्थापन)

स्टार्टअप-२०चे अध्यक्ष डॉ. चिंतन वैष्णव (मध्यभागी) आणि इतर मान्यवर

पणजी, ४ जून (वार्ता.) – जी-२०च्या स्टार्टअप-२० प्रतिबद्धता गटाच्या गोव्यात पणजी येथे ३ आणि ४ जून या कालावधीत झालेल्या तिसर्‍या बैठकीत जी-२० राष्ट्रांनी भविष्यात जागतिक स्तरावर स्टार्टअपसाठी अनुकूल वातावरण निर्मितीसाठी संघटित होण्याचा निर्णय घेतला. ही बैठक स्टार्टअप-२०चे अध्यक्ष डॉ. चिंतन वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी प्रमुख सूत्रे अन् संघटितपणे करायचे प्रयत्न यांवर सखोल चर्चा केली.

बैठकीनंतर सायंकाळी पत्रकारांना संबोधित करतांना डॉ. चिंतन वैष्णव म्हणाले, पॉलिसी कम्युनिकेशनला आज जागतिक स्तरावर महत्त्व आहे. जी-२० राष्ट्रांचे जागतिक स्तरावर स्टार्टअपसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी एकमत झाले आहे. बैठकीत स्टार्टअपसाठी आराखडा सिद्ध करणे, स्टार्टअपला साहाय्य करण्यासाठी संस्थांचे जाळे सिद्ध करणे, स्टार्टअपसाठी मार्केट रेग्युलेशनचे नियम शिथिल करणे, आदी कृतीसंबंधी सूत्रांवर चर्चा झाली. वर्ष २०२३ पर्यंत जगभरात स्टार्टअप इकोसिस्टमसाठी १ ट्रिलीयन डॉलर निधी उपलब्ध करणे आवश्यक आहे.

ओडिशा येथील रेल्वे दुर्घटनेत  मृत पावलेल्यांना श्रद्धांजली

बैठकीच्या शेवटी ओडिशा येथील रेल्वे दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वहाण्यात आली. जी-२०च्या स्टार्टअप-२० प्रतिबद्धता गटाची पुढील बैठक गुरुग्राम येथे ३ आणि ४ जुलै या दिवशी होणार आहे.