ओडिशातील अपघातग्रस्तांना रा.स्व. संघ आणि बजरंग दल यांच्याकडून साहाय्य

  • घटनास्थळी प्रथम पोचून घायाळांना रुग्णालयात नेले !

  • मोठ्या प्रमाणात केले रक्तदान !

बालासोर (ओडिशा) – येथील रेल्वे अपघातानंतर सरकारकडून बचाव कार्य करण्यासह रुग्णालयातही योग्य व्यवस्था केली जात आहे. याच वेळी काही सामाजिक संस्थांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनाही साहाय्यासाठी पोचलेल्या आहेत. बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडूनही साहाय्यता कार्य केले जात आहे.

१. संघ आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते रुग्णालयात जाऊन घायाळांच्या भोजनाची, तसेच फळाचा रस, पाणी आदी आवश्यक साहित्य देत आहेत. तसेच अनेक कार्यकर्ते रक्तदान करत आहेत. याविषयी बजरंग दलाकडून त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्वीट करून माहिती देण्यात आली आहे. दोन्ही संघटनांचे २५० हून अधिक कार्यकर्ते अपघातानंतर घटनास्थळी पोचले होते आणि त्यांना घायाळांना डब्यांतून काढण्यास, तसेच रुग्णालयात पोचवण्याचे कार्य केले.

२. ओडिशातील संघाचे प्रांत प्रचार प्रमुख रविनारायण पंडा यांनी सांगितले, ‘अपघात झालेल्या बहानगा गावामध्ये संघाचे अनेक कार्यकर्ते रहतात. अपघाताची माहिती मिळाल्यावर ते तातडीने अपघातस्थळी पोचले आणि त्यांनी बचावकार्य चालू केले. चारचाकी गाडी, दुचाकी, ट्रक्टर आदींच्या साहाय्याने त्यांनी घायाळांना रुग्णालयात पोचवले.’

संपादकीय भूमिका

किती इस्लामी आणि ख्रिस्ती संघटना अशा प्रकारचे कार्य करतात ? हिंदूंच्या  या संघटनांवर बंदीची मागणी करणार्‍या किती राजकीय पक्षांचे कार्यकर्ते साहाय्यासाठी धावून आले, हेही त्यांनी सांगायला हवे !