मी परदेशात जाऊन राजकारण करत नाही ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांचे दक्षिण आफ्रिकेत राहुल गांधी यांना प्रत्युत्तर !

डावीकडून राहुल गांधी आणि डॉ. एस्. जयशंकर

केप टाऊन (दक्षिण आक्रिका) – मी परदेशात जाऊन राजकारण करत नाही आणि यापुढेही करणार नाही, असे उत्तर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे एका तरुणाने विचारलेल्या प्रश्‍नाला दिले. या तरुणाने राहुल गांधी यांचे नाव न घेता ‘अमेरिकेतील काही लोक भारताविषयी वक्तव्ये करत आहेत. त्याविषयी तुम्ही काय सांगाल ?’ असा प्रश्‍न विचारला होता. एस्. जयशंकर पुढे असेही म्हणाले, ‘‘कदाचित् मी कुणाशीही सहमत नाही; पण मी भारतात परतल्यानंतरच माझी प्रतिक्रिया व्यक्त करीन. लोकशाहीत सामूहिक दायित्व असते. राष्ट्रहित पाहिले जाते. काही गोष्टी राजकारणाच्या वरच्या असतात. देशाबाहेर पाऊल ठेवतांना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.’’ राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन येथे एका कार्यक्रमात बोलतांना भारतातील घटनांवरून टीका केली होती.

परराष्ट्रमंत्री जयशंकर हे ‘ब्रिक्स’ देशांच्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेत आले आहेत. या वेळी त्यांनी भारतीय वंशाच्या लोकांचीही भेट घेतली.