कोल्हापूर – संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार सर्व कामे येत्या १० जूनपूर्वी पूर्ण करावीत. मान्सूनपूर्व कामांत हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. मान्सूनपूर्व सिद्धतेविषयी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास जीवित अथवा वित्त हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पूरप्रवण गावांमधील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या त्या-त्या गावांमध्ये तैनात ठेवाव्यात. जिल्ह्यातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून घ्या. नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नदीतील भराव, कचरा काढून घ्या. धोकादायक इमारतींची जलदगतीने दुरुस्ती करून घ्या. धोकादायक झाडांच्या फांद्या काढा. सर्व विभागांच्या नियंत्रण कक्षांचे दूरभाष क्रमांक आणि ‘टोल फ्री’ क्रमांक चालू रहातील याची दक्षता घ्या. पाणी आणि वीज पुरवठा सुरळीत राहील, यासाठी आवश्यक ती काळजी घ्या.’’
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी रस्त्यावर पाणी येणार्या ठिकाणी बॅरिकेड्स, तसेच आवश्यक त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे सांगितले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने केलेल्या सूक्ष्म नियोजनाची माहिती प्रसाद संकपाळ यांनी दिली.