शवावर केलेल्या बलात्कारावर कठोर शिक्षेची तरतूद असलेला कायदा करा ! – कर्नाटक उच्च न्यायालय

  • कायद्यात सुधारणा करण्याचा केंद्र सरकारला आदेश !

  • कायद्यातील त्रुटीमळे आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यातून मुक्त !

  • हत्येच्या प्रकरणी सुनावलेली शिक्षा मात्र कायम !

नवी देहली – एका अल्पवयीन मुलीची हत्या करून तिच्या शवावर बलात्कार केलेल्या आरोपीला हत्येच्या गुन्ह्यासाठी शिक्षा देण्यात आली; परंतु कायद्यातील पळवाटेचा अपलाभ घेतल्याने त्याला बलात्काराच्या गुन्ह्यासाठी शिक्षा देता आलेली नाही. संबंधित प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने यावर केंद्र सरकारला आदेश दिला आहे की, राज्यघटनेतील कलम ३७७ च्या अंतर्गत शवावर केलेल्या बलात्कारावर शिक्षेची तरतूद नसल्याने सरकारने येत्या ६ मासांत कायद्यामध्ये पालट करावा. कायद्यात या गुन्ह्यासाठी आजीवन कारावास अथवा किमान १० वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असावी.

संबंधित प्रकरण कर्नाटक राज्यात असलेल्या तुमकुरू येथील असून जून २०१५ मध्ये रंगराजू नावाच्या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीची हत्या करून तिच्या शवावर बलात्कार केला होता. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्याला हत्या अन् बलात्कार अशा दोन्ही आरोपांखाली शिक्षा सुनावली होती. यावर रंगराजूने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने वरील आदेश दिला.

राज्यघटनेतील कलम ३७७ हे पुरुष, स्त्री अथवा प्राणी यांच्यासंदर्भात केलेल्या अप्राकृतिक लैंगिक संबंधांविषयी भाष्य करते आणि त्यासंदर्भात असलेल्या गुन्ह्यांवरील शिक्षेची तरतूद सांगते; परंतु यामध्ये पुरुष, स्त्री अथवा प्राणी यांच्या शवावर केलेल्या अत्याचारांविषयी कोणतीच स्पष्टता नाही.

संपादकीय भूमिका

  • प्रत्येक वेळी न्यायालयाला सरकारला विविध कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास सांगावे लागणे अपेक्षित नाही ! सरकारने कायद्यांमधील न्यूनता शोधून काढून स्वत:हून त्यात पालट करणे आवश्यक आहे. या जोडीलाच आतापर्यंत देशातील विविध न्यायालयांनी कायद्यांमध्ये पालट करण्याचे जे जे आदेश सरकारला दिले आहेत, त्यांवर सरकारने काय केले ?, यासंदर्भातही एक समिती नेमून त्याचा अहवाल नियमितपणे सादर केला जावा, असेच संवेदनशील नि न्यायप्रिय जनतेला वाटते !
  • समाजपुरुष अध्यात्मविहीन होत चालल्याचेच हे द्योतक आहे. समाजमनावर नैतिक मूल्ये आणि साधना यांचे संस्कार केल्यावरच समाज नीतीमान बनेल. यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !