खलिस्तानसाठी जनमत संग्रह घेणारा कार्यक्रम ऑस्ट्रेलिया सरकारकडून रहित !

खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने केले होते आयोजन !

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने येथे ४ जून या दिवशी आयोजित केलेल्या खलिस्तानच्या जनमत संग्रह घेण्याचा कार्यक्रम रहित करण्यात आला. ‘सिडनी मेसोनिक सेंटर’मध्ये हा कार्यक्रम होणार होता. ही माहिती मिळाल्यानंतर सातत्याने या विरोधात तक्रारी येत होत्या. त्यामुळे सुरक्षायंत्रणांनी त्याचे आयोजन रहित करण्यास ऑस्ट्रेलिया सरकारला सांगितले. या कार्यक्रमाच्या विरोधात तक्रार करणारे धर्मेंद्र यादव यांनी सांगितले की, ‘सिख फॉर जस्टिस’च्या प्रचार कार्यक्रमासाठी बनवण्यात आलेली भित्तीपत्रके आणि फलक यांच्याद्वारे आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असणार्‍यांची प्रशंसा करण्यात आली होती. गेल्या ५ दिवसांपासून हिंदुविरोधी घोषणा असलेले फलक पहायला मिळत होते.

‘द ऑस्ट्रेलिया टुडे’ने सांगितले की, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍याच्या वेळी त्यांना आश्‍वासन दिले होते की, त्यांचे सरकार दोन्ही देशांतील संबंधांमध्ये कटुता आणण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या कट्टरतावादी तत्त्वांच्या विरोधात कठोर कारवाई करणे चालू ठेवील.

संपादकीय भूमिका 

भारताशी संबंध सुदृढ होण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या ऑस्ट्रेलियाला तेथील भारतविरोधी शक्तींचा नायनाट करण्यासाठी आता कटीबद्ध व्हावे, असे भारताने त्याला सांगणे आवश्यक !