चिपळूण, २६ मे (वार्ता.) – येथील ‘ॲक्टिव्ह ग्रुप’च्या वतीने नुकतेच ‘चिपळूण तालुका परिसर पर्यटन विकास’ या विषयावर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’चे अध्यक्ष श्रीराम रेडिज, पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते, तथा लेखक धीरज वाटेकर, ग्रामकौशल्य मार्गदर्शन केंद्राच्या प्रज्ञा जोगळेकर, हॉटेल व्यावसायिक प्रकाश (बापू) काणे, मिलिंद कापडी आणि कृषी अधिकारी मनोज गांधी आदींनी मार्गदर्शन केले.
प्रकाश (बापू) काणे यांनी उपस्थितांचा परिचय आणि स्वागत करून या क्षेत्रातील अनुभव अन् नवी दिशा यावर स्वत:ची भूमिका मांडली. ‘ॲक्टिव्ह ग्रुप’चे अध्यक्ष कैसर देसाई यांनी त्यांच्या संस्थेचा उपस्थितांना परिचय करून दिला. त्यांनी चिपळूण तालुका परिसर पर्यटन विकास चळवळीस उभारी देण्याचे आवाहन केले. रामशेठ रेडीज यांनी ग्लोबल चिपळूण टुरिझम सोसायटीने स्थानिक परिसराच्या पर्यटन आणि पूरक केलेल्या कामाची माहिती दिली. प्रज्ञा जोगळेकर यांनी ‘पर्यटन आणि महिला’ अंतर्गत हस्तकला कौशल्याविषयी माहिती दिली. ओमेगा हॉटेलचे संचालक मिलिंद कापडी यांनी चिपळूण पर्यटनातील हॉटेलिंग व्यवसायाचे दायित्व आणि भूमिका विशद केली. कृषी अधिकारी मनोज गांधी यांनी शाश्वत कृषी पर्यटन व्यवसाय आणि सामाजिक भान याविषयी विचार मांडले.
सह्याद्रीच्या आजूबाजूच्या भटकंतीसाठी ‘चिपळूण’ प्रसिद्ध व्हायला हवे ! – धीरज वाटेकर
चिपळूण तालुका परिसर आणि समग्र कोकण पर्यटन : काल – आज – उद्या या सूत्रानुरूप मांडणी करतांना लेखक धीरज वाटेकर म्हणाले की,
१. आगामी काळात शहराला उपलब्ध होणारे रस्ते आणि अन्य सुविधांच्या पार्श्वभूमीवर हेरीटेज अन् सह्याद्रीतील आजूबाजूच्या भटकंतीसाठी ‘चिपळूण’ प्रसिद्ध आणि विकसित करायला हवे.
२. श्री.ना. पेंडसे यांची ‘तुंबाडचे खोत’ या कादंबरीतील परिसर, निसर्गरम्य दिवा बेट, शिरवलीचे खासगी पक्षी अभयारण्य, मल्हार इंदुलकर यांचे ‘अरण्यावाट’ इको-स्टे, गोविंदगड (गोवळकोट) किल्ला, ‘पर्वतीय वनदुर्ग’ किल्ला वासोटा, किल्ले भैरवगड, किल्ले तिवरेगड, किल्ले बारवई (१२ कोरीव लेणी, ओवरी) आणि अन्य हेरिटेज या सर्वांचे आधुनिक स्वरूपात दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) करून ते शहरातून जाणार्या महामार्गारून प्रवास करणार्या पर्यटकांसाठी एखाद्या अद्ययावत ‘एम्फी थिएटर’मध्ये पहायला उपलब्ध करायला हवे.
३. चिपळूण पर्यटन मोठ्या फलकांद्वारे लोकाभिमुख करण्याची आवश्यकता आहे. चिपळूणच्या पर्यटन विकासासाठी ‘पर्यटन संस्कृती आणि लोकसहभाग’ महत्त्वाचा आहे.
४. ‘बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल (मगर) सफारी महोत्सव’ आदी शहर आणि तालुका पर्यटन विकासासाठी शासकीय आस्थापनांकडून निधी उपलब्ध व्हायला हवा.
या वेळी श्रीक्षेत्र परशुराम येथील ‘डोंगरमाथा’ इको टुरिझम प्रकल्पाचे मंगेश गोवेकर यांनी निसर्ग-पर्यावरण याविषयी स्वत:चे अनुभव सांगितले. ‘अरण्यक’ प्रकल्पाचे संचालक विनित वाघे यांनी ते राबवत असलेल्या प्रयोगांची माहिती दिली. दिनेश दळवी यांनी वालोटी गावात वसलेल्या त्यांच्या निसर्ग अन् कृषी पर्यटन प्रकल्पातील प्रयोगांची ओळख करून दिली. विश्व रसायन आरोग्यकेंद्राचे डॉ. अतिन औताडे यांनी आयुर्वेद वैद्यकीय पर्यटन याविषयीची माहिती दिली. ज्येष्ठ महिला जलतरण क्रीडापटू, निसर्ग पर्यटनप्रेमी श्रीमती माधवी साठे यांनी त्यांचे स्वानुभव सांगितले. सर्वांचे आभार ‘पर्यटनदूत’ समीर कोवळे यांनी मानले.