रत्नागिरीत हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदू एकतेचा आविष्कार !

धर्मध्वजाचे पूजन करतांना हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. चंद्रकांत राऊळ. या प्रसंगी उपस्थित असलेले १. सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरू सत्यवान कदम

रत्नागिरी, २१ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ अभियान राबवण्यात येत आहे. हिंदूंना जात, प्रांत, संप्रदाय आणि भाषा यांमध्ये विभाजित करण्याची कारस्थाने रचली जात आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हिंदू ऐक्याचा आविष्कार दाखवण्यासाठी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील जयस्तंभ – रामनाका – टिळक आळी – लक्ष्मी चौक असा या दिंडीचा मार्ग होता. या ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये १ सहस्र २५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

दिंडीच्या आरंभी सनातन संस्थेचे श्री. ज्ञानदेव पाटील यांनी शंखनाद केला. धर्मध्वजाचे पूजन हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. चंद्रकांत राऊळ यांनी केले. त्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राकेश नलावडे यांनी धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या पालख्या

दिंडीमध्ये असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या पालखीतील प्रतिमेचे पूजन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले, तसेच भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन जनजागृती संघाचे श्री. केशव भट यांनी केले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. तेजस साळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिंडीला आरंभ झाला. दिंडीचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी सांगितला, तर सौ. प्रिया बने यांनी सूत्रसंचालन केले.

दिंडीचे स्वरूप

अग्रभामी धर्मध्वज, त्या पाठोपाठ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांची प्रतिमा असलेल्या पालख्या, त्यामागे सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्या टोप्या घातलेले महिलांचे पथक, प्रथमोपचार पथक, स्वसंरक्षण प्रशिक्षण पथक, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला, भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत रममाण होणार्‍या गोपिका, भगवे ध्वज हातात घेतलेले धर्मवीर, महान हिंदु संस्कृतीची माहिती सांगणारा बालकक्ष, टिपर्‍यांवर ताल धरलेल्या महिला आणि वारकरी आदी पथकांचा सहभाग असलेल्या दिंडीमुळे बाजारपेठ अत्यंत फुलून गेली होती.

दिंडीत मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठ महिला

शहरातील श्री राम मंदिराच्या ठिकाणी धर्मध्वज आणि पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. सुवासिनींनी धर्मध्वज आणि पालखी यांचे पूजन केले. दिंडीची सांगता शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा असलेल्या लक्ष्मी चौकात झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. रवींद्र भुवड यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लाठी-काठी, दंडसाखळी दाखवण्यात आली, तर संगमेश्वर तालुक्यातील गंगाविस तालीम, ओझरे खुर्द यांनी दांडपट्टा, तलवार, दंडगोल आदींची प्रात्यक्षिके दाखवली.

मंदिरे ही आपली शक्तीस्थाने झाली पाहिजेत ! – अधिवक्ता सचिन रेमणे, विश्व हिंदु परिषद

या दिंडीच्या माध्यमातून विविधतेतून एकतेचे दर्शन घडले. ईश्वराचे अधिष्ठान असल्यामुळे हे धर्मकार्य आपल्याकडून होत आहे. हिंदु म्हणून एकत्र येण्यासाठी आपण आजपासूनच आपल्या जवळच्या मंदिरामध्ये हिंदु समाजाला धर्मशिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपली मंदिरे ही आपली श्रद्धास्थाने आहेतच, पण आता ती आपली शक्तीस्थाने होणे ही काळाची आवश्यकता आहे. विविध प्रकारचे जिहाद म्हणजे आपल्यावरील सांस्कृतिक आणि आर्थिक आक्रमणे आहेत. ती थोपवण्यासाठी एकत्रितपणे विरोध करणे आणि त्यासाठी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असणेही महत्त्वाचे आहे. असे होईल, तेव्हा भारत विश्वगुरु म्हणून उदयास येईल.

धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण  करतांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राकेश नलावडे

आध्यात्मिक स्तरावर कार्य होण्यासाठी प्रयत्न करूया  ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य वेचणारी एक विभूती आहे. भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, हे त्यांनी १९९७ या वर्षीच सांगून ठेवले होते. हिंदु राष्ट्रासाठी एका धर्माधिष्ठित समाजाची आवश्यकता आहे. यासाठी धर्माचरण आवश्यक आहे. धर्माचरणातून निर्माण झालेला धर्माभिमानी हिंदु समाज शीघ्र संघटित होईल आणि संघटित समाजच हे कार्य अधिक परिणामकारक करू शकेल. हे कार्य करतांना ते भावनिक स्तरापेक्षा आध्यात्मिक स्तरावर होणे अपेक्षित आहे.

उपस्थिती

हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. अरुण जयस्वाल, श्री. मंदार देसाई, रा.स्व. संघाचे सर्वश्री गजानन करमरकर, रवींद्र भुवड, मंगेश मोभारकर, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. दादा रणदिवे, ह.भ.प. चंद्रकांत पवार, ह.भ.प. गोविंदबुवा चव्हाण, खेड तालुका वारकरी संघटनेचे सचिव ह.भ.प. गणपत महाराज येसरे, दापोली-गावतळे येथील ह.भ.प. चंद्रकांत महाराज पवार, निवखोल येथील मोरया वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा कु. निशा आलीम आणि सौ. युगा पावसकर , श्री मरुधर विष्णु समाजाचे श्री. छगन चिपा, लांजा येथील वारकरी दिंडी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद गादीकर, सनातन संस्थेचे श्री. महेंद्र चाळके आदी उपस्थित होते.

आभार

दिंडीसाठी केळये, रत्नागिरी येथील श्री. सुनील सहस्रबुद्धे यांनी सहकार्य केले, तसेच जैन संघटनेने सरबत आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. शिल्पा सुर्वे यांनी पाणी उपलब्ध करून दिले.