पुतिन यांच्या पालकांचा अवमान केल्याच्या प्रकरणी रशियातील महिलेला २ वर्षांचा कारावास !

महिलेने पुतिन यांच्या पालकांना ‘तुम्ही राक्षस जन्माला घातला आहे’ असे म्हटल्याचे प्रकरण

सेंट पीटर्सबर्ग (रशिया) – येथील न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आई-वडिलांचा अवमान केल्याच्या प्रकरणी एका महिलेला २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. इरिना सिबानेवा नावाच्या या महिलेने पुतिन यांच्या आई-वडिलांच्या कबरीजवळ एक चिठ्ठी ठेवली होती. या चिठ्ठीत लिहिले होते की, ‘तुम्ही राक्षस जन्माला घातला आहे. पुतिन जगासाठी संकट निर्माण करत आहेत. तुम्ही त्यांना तुमच्याकडे बोलावा. पुतिन मरण पावावेत, अशी सर्व जग प्रार्थना करत आहे.’

या महिलेने न्यायालयात बाजू मांडतांना म्हटले की, युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या बातम्या पाहून मी घाबरले होते. ती चिठ्ठी मी कधी लिहिली होती ? आणि त्यात काय लिहिले होते ? तेही मला आता आठवत नाही. मला क्षमा करा, माझ्या कृतीमुळे एखादा इतका दुखावला जाईल, याची मला कल्पना नव्हती.