हिंदी महासागरात चीनच्या नौदलाच्या वाढत्या उपस्थितीमुळे युद्धाची शक्यता नाकारता येत नाही ! – नौदलप्रमुख हरि कुमार

नौदलप्रमुख हरि कुमार

नवी देहली – हिंदी महासागरात चीनच्या ३ ते ६ युद्धनौका एकाच वेळी तैनात असतात. यांपैकी काही ओमानच्या आखातामध्ये, तर काही महासागराच्या पूर्वेकडे आहेत. तसेच काही चिनी संशोधक नौका आणि मासेमारीच्या नौका महासागरात तळ ठोकून असतात. पाकिस्तानसह अनेक देशांच्या बंदरांजवळ चिनी युद्धनौकांची उपस्थिती आहे. या सर्वांवर भारतीय नौदलाची करडी दृष्टी आहे. अशात संघर्षाचा धोका पुष्कळ अल्प आहे; मात्र तरीही आपण युद्धाची शक्यता नाकारू शकत नाही, अशी माहिती भारतीय नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल हरि कुमार यांनी ‘चाणक्य डायलॉग’ या कार्यक्रमात दिली.

सौजन्य: WION

नौदलप्रमुख हरि कुमार म्हणाले की,

१. महासागरात कुणाची उपस्थिती आहे आणि ते काय करत आहेत, हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. याची सातत्याने निगराणी केली जात आहे आणि आम्ही विमान, ड्रोन, युद्धनौका, पाणबुड्या तैनात करत आहोत.

२. पाक त्याच्या नौदलाचा पुष्कळ वेगाने विकास करत आहे आणि त्याच्या ताफ्यात नवनव्या युद्धनौकांचा समावेश करत आहे. चीनने गेल्या १० वर्षांत अनेक युद्धनौका आणि पाणबुड्या यांचा नौदलात समावेश केला आहे. चीन तिसर्‍या विमानवाहू युद्धनौकेवरही काम करत आहे. चीन अनेक मोठ्या विध्वंसक युद्धनौकाही विकसित करत आहे. लवकरच त्यांचा चिनी नौदलात समावेश होऊ शकतो.