‘आदर्श शाळा पुरस्कार’प्राप्त आचरा केंद्रशाळेत शिक्षकांची पदे रिक्त

शाळा व्यवस्थापन समितीची ‘शाळा बंद’ आंदोलन करण्याची चेतावणी

केंद्रशाळा आचरे क्रमांक १

मालवण – तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या ‘केंद्रशाळा आचरे क्रमांक १’ या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या मागणीकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत शिक्षकांची पदे न भरल्यास नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद ठेवण्याची संतप्त भूमिका शाळा व्यवस्थापन समितीने घेतली आहे. याविषयी २५ एप्रिल या दिवशी पंचायत समितीमध्ये निवेदन देण्यासाठी ग्रामस्थ गेले असता कार्यालयात कुणीच नसल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. काही वेळाने शिक्षण विस्तार अधिकारी कार्यालयात आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रथमेश घाडी, शिक्षक पालक समितीचे उपाध्यक्ष जयप्रकाश परुळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि पालक उपस्थित होते. या शाळेला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा पुरस्कारा’ने गौरवण्यात आले आहे.

केंद्रशाळाआचरे  क्रमांक १ या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेत १४४ विद्यार्थी आहेत. यासाठी शिक्षकांची ६ पदे संमत असून त्यापैकी आता केवळ २ शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त पदे भरण्याविषयी सातत्याने मागणी करूनही त्याची नोंद घेतली जात नाही. तसेच गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारीही वस्तूस्थिती जाणूनही घेत नाहीत. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात १५ जूनपासून शाळा बंद ठेवण्याचा  विचारात ग्रामस्थ आहेत.

संपादकीय भूमिका

सर्वत्र सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना शिक्षकांची पदे रिक्त रहाणे आणि त्यासाठी जनतेला आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !