बालपणापासून खडतर जीवन जगलेल्‍या सनातनच्‍या ६४ व्‍या संत पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ९८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ९८ वर्षे) यांचे जीवन बालपणापासूनच खडतर होते. त्‍यांनी अनेक त्रास सहन करून मुलींना वाढवले. हे खडतर जीवन जगत असतांना त्‍यांनी त्‍याविषयी एकदाही देवाकडे गार्‍हाणे केले नाही. त्‍यांनी आहे ती परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारली. उतारवयात त्‍यांचा संपर्क सनातनच्‍या साधकांशी झाला आणि त्‍यांनी नामजपाला आरंभ केला. त्‍यानंतर त्‍यांचा नामजप अखंड होऊ लागला. नंतर त्‍या संतपदी विराजमान झाल्‍या.

पू. आजींचा साधनाप्रवास येथे दिला आहे. २४.४.२०२३ या दिवशी या साधनाप्रवासातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/676144.html
पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी

११. पू. आईंनी मुलींवर चांगले संस्‍कार केल्‍याने त्‍यांच्‍या मोठ्या मुलीने सासरी त्रासांमध्‍ये राहूनही सर्वांशी चांगले वागणे

‘पू. आईंनी पुष्‍कळ कष्‍ट करून मुलींना लहानाचे मोठे केले. त्‍यांना आम्‍ही दोन मुली आहोत. माझ्‍या मोठ्या बहिणीचे (श्रीमती चंद्रभागा बापुराव कापरे हिचे) लग्‍न आमच्‍या नात्‍यातच केले. तिला सासरी पुष्‍कळ सासुरवास होता; पण पू. आईंची गरिबी असल्‍यामुळे बहिणीने त्‍याविषयी आईकडे कधी तक्रार केली नाही. पू. आईंनी आमच्‍यावर चांगले संस्‍कार केल्‍यामुळे माझी मोठी बहीण घरातील सर्वांशी आदराने वागत होती.

१२. मुलींच्‍या लग्‍नानंतर पायी पंढरपूरची वारी करणे

श्रीमती इंदुबाई भुकन

माझ्‍या लग्‍नानंतर त्‍या एकट्याच रहायच्‍या. एकट्या असल्‍यामुळे त्‍या वेगवेगळ्‍या तीर्थक्षेत्री जाऊन यायच्‍या. पंढरपूरची वारी त्‍या पायी करायच्‍या, तसेच एकादशी करायच्‍या. देवावर त्‍यांची भोळी भक्‍ती होती.

१३. स्‍वतः कष्‍ट करून मुलींची बाळंतपणे करणे

त्‍यानंतर पू. आई स्‍वतःच कष्‍ट करून पैसे मिळवायच्‍या आणि रहायच्‍या. माझ्‍या बहिणीची ३ आणि माझी ५ बाळंतपणे करण्‍यासाठी लागणारे सर्व पैसे त्‍यांनी स्‍वतः इतरांची कामे करून मिळवले.

१४. पत्नी, आई आणि आजी, अशी सर्व नाती निभावणे 

त्‍यानंतर त्‍यांनी त्‍यांच्‍या पतीच्‍या आजारपणात पतीची पुष्‍कळ काळजी घेतली. त्‍या वेळी त्‍यांची सवत पतीकडे लक्ष देत नव्‍हती. पू. आई पतीला जे हवे ते करून खाऊ घालायच्‍या. त्‍या आजारपणात त्‍यांचे पती वारले.

पू. आईंनी दोन्‍ही मुलींच्‍या घरचे रितीरिवाज पूर्ण केले. मुलीच्‍या सासरी काही शेतीची कामे निघाली, तरी त्‍या त्‍यांच्‍याकडे कामाला जायच्‍या आणि नातवंडांनासुद्धा (मुलींच्‍या मुलांनासुद्धा) सांभाळायच्‍या, तसेच लागेल ते साहाय्‍य करायच्‍या.

१५. मुलीच्‍या घरी अडचण असतांना पू. आईंनी साहाय्‍याला जाणे आणि घर अन् शेत यांतील सर्व कामे करणे

माझ्‍या मुलीच्‍या लग्‍नात काढलेले कर्ज फेडण्‍यासाठी पैसे हवे; म्‍हणून मला आणि माझ्‍या यजमानांना ((कै.) श्रीधर भुकन यांना) ऊस तोडण्‍यासाठी पुण्‍याला जावे लागणार होते. त्‍या वेळी ‘माझी २ मुले आणि २ मुली सांभाळणे अन् शेती आणि गुरे सांभाळणे’, यांसाठी आम्‍ही पू. आजींना टाकळी (ता. आष्‍टी, जिल्‍हा बीड) येथे आणले. त्‍यासुद्धा मुलीला साहाय्‍य हवे; म्‍हणून सर्व सोडून माझ्‍याकडे आल्‍या. ४ मुलांना सांभाळणे, स्‍वयंपाक करणे, गायी आणि गुरे सांभाळणे, शेतीची कामे, म्‍हणजे खुरपणे, पाणी देणे, भाजीपाला काढणे इत्‍यादी सर्व कामे त्‍यांनाच करावी लागत. त्‍या सर्व कामे मन लावून करत असत. त्‍यांना कुठे जावे लागले, तर त्‍या पहाटेच उठून मुलांसाठी स्‍वयंपाक करून ठेवायच्‍या आणि गावी जाऊन त्‍याच दिवशी परत यायच्‍या.

१६. नातवंडांवर चांगले संस्‍कार करणे

अ. माझ्‍या मुलांना (श्री. रामेश्‍वर आणि श्री. वाल्‍मीक भुकन, सौ. मंगला खेतमाळस अन् सौ. सीमा अनारसे यांना) एकटे सोडून त्‍या कुठेही जात नसत. त्‍यांनी त्‍यांच्‍या नातवंडांवर चांगले संस्‍कार केले. ‘घरी आलेले वाटसरू आणि पाहुणे यांना चहा-पाणी देणे, जेवण करून देणे’, असे सर्व त्‍या न थकता करायच्‍या. हेच त्‍यांनी नातवंडांनाही शिकवले.

आ. गावातील देवळात कीर्तन आणि पोथीवाचन (भगवद़्‍गीता, रामायण या ग्रंथांचे वाचन) असायचे. त्‍या नातवंडांना घेऊन देवळात जायच्‍या. त्‍या मुलांना नियमितपणे शाळेत पाठवायच्‍या. त्‍यांनी कामासाठी कधी मुलांना घरी ठेवून घेतले नाही. त्‍यांनी स्‍वतः कष्‍टाची सर्व कामे केली.

१७. पू. आईंना जीवनात बर्‍याच दुःखांना सामोरे जावे लागणे

त्‍या १२ वर्षांच्‍या असतांना त्‍यांची आई बाळंतपणात वारली. माझे यजमान म्‍हणजे पू. आईंचे लहान जावई हृदयविकाराने वारले. त्‍यानंतर १ वर्षातच मोठे जावई विजेच्‍या धक्‍क्‍याने मृत्‍यू पावले. पू. आईंचे दोन्‍ही जावई एक वर्षात मृत्‍यू पावले. ही दोन्‍ही दुःखे पचवणे पुष्‍कळच कठीण होते. अशा स्‍थितीतही त्‍या स्‍थिर होत्‍या. पू. आईंना दोन्‍ही मुलींना आधार द्यावा लागला. त्‍यांनी त्‍यांच्‍या मोठ्या मुलीचीही मुले सांभाळली.

१८. कोणतीही अपेक्षा न ठेवता मुलीला सर्वतोपरी साहाय्‍य करणे 

आता मुलगी आणि नातवंडे यांंना कुणी नाही; म्‍हणून त्‍या माझ्‍याकडेच राहिल्‍या, ते कायमच्‍याच ! त्‍यांनी मला मोठा आधार दिला. नातवंडांच्‍या शिक्षणासाठी त्‍यांनी त्‍यांच्‍याकडील सर्व पैसे दिले आणि मुलगी अन् नातवंडे यांसह हलाखीत दिवस काढले. पू. आईंमुळे मला मुले सांभाळणे आणि त्‍यांना मोठे करणे सोपे झाले. माझ्‍या दुःखाचा पुष्‍कळ मोठा वाटा त्‍यांनी उचलला. हे सर्व करतांना त्‍यांना कशाचीच अपेक्षा नव्‍हती.

१९. सर्वांशी प्रेमाने वागणे

पू. आई मला आधार देत आहेत; म्‍हणून माझ्‍या सासरचे त्‍यांना त्रास द्यायचे. ते कधी कधी त्‍यांच्‍याशी भांडायचे; पण त्‍या कधीच कुणाशी भांडल्‍या नाहीत. त्‍या सर्वांशी प्रेमाने वागल्‍या. पू. आई घरी असायच्‍या; म्‍हणून मला सर्व कामे करायला जमायचे. हे सर्व करतांनासुद्धा पू. आईंनी देवाकडे कधी तक्रार केली नाही.

२०. पू. आईंना आलेली अनुभूती

२० अ. एकादशीच्‍या दिवशी भगवे वस्‍त्र परिधान केलेली एक व्‍यक्‍ती घरी येणे आणि तिने पू. आईंकडे खायला मागणे : पू. आई आमच्‍याकडेच रहात होत्‍या. एकदा एकादशीला त्‍या एकट्याच घरी होत्‍या. मी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. उपवासाचा फराळ करून त्‍या बसल्‍या होत्‍या. त्‍या वेळी त्‍यांच्‍याकडे भगवे वस्‍त्र घातलेली एक व्‍यक्‍ती आली. त्‍या व्‍यक्‍तीने ‘घरात कुणी आहे का ?’, असे विचारले. तेव्‍हा पू. आईंनी त्‍यांना सांगितले, ‘‘माझी मुलगी बाजारात गेली आहे. मी एकटीच आहे.’’ तेव्‍हा तिने पू. आईंना विचारले, ‘‘मला भूक लागली आहे. तुमच्‍याकडे काही खायला आहे का ?’’ त्‍या वेळी केवळ उपवासासाठी केलेला वरीचा गोड भात होता; पण तोही अल्‍पाहाराचे दोन चमचेच शिल्लक राहिला होता.

२० आ. वरीचा भात थोडासाच असूनही त्‍या व्‍यक्‍तीचे पोटभर खाऊन झाल्‍यावरच ताटातील भात संपणे : पू. आईंनी त्‍या व्‍यक्‍तीला बसायला गोधडी दिली, पिण्‍यास पाणी दिले आणि २ चमचे वरीचा भात दिला. पू. आई त्‍या व्‍यक्‍तीला म्‍हणाल्‍या, ‘‘हा एवढाच भात तुम्‍हाला पुरणार नाही. मी आता दुसरा भात बनवते.’’ तेव्‍हा ती व्‍यक्‍ती म्‍हणाली, ‘‘मला एवढाच पुरे !’’ ती व्‍यक्‍ती पू. आईंसह बोलत बोलत भात खात होती, तरीही तो भात आहे तेवढाच रहात होता. हे सर्व पू. आई पहात होत्‍या. जेव्‍हा त्‍या व्‍यक्‍तीचे पोटभर खाऊन झाले, तेव्‍हाच तो भात संपला. ती व्‍यक्‍ती पू. आईंना म्‍हणाली, ‘‘माझे पोट भरले. मी तृप्‍त झालो.’’ हे पाहून पू. आईंना आश्‍चर्य वाटले.

२० इ. त्‍या अनोळखी व्‍यक्‍तीने पू. आईंच्‍या कुटुंबाविषयी सत्‍य माहिती सांगणे : त्‍यांनी पू. आईंना ‘कुटुंबात कोण कोण असते ?’, याविषयी सर्व सांगितले. तेव्‍हा ‘ते अनोळखी असतांनासुद्धा सर्व सत्‍य सांगत आहेत’, हे पू. आईंच्‍या लक्षात आले. घरात गंगेचे पाणी बाटलीत ठेवले होते. हेसुद्धा त्‍यांनी पू. आजींना सांगितले. ‘घरात कुणाचा स्‍पर्श होऊन ते अशुद्ध व्‍हायला नको; म्‍हणून पाण्‍याची बाटली बाहेर झाडाला टांगून ठेवण्‍यास सांगितले. ‘घरात गंगेचे पाणी आहे’, हे पू. आईंनासुद्धा ठाऊक नव्‍हते.

२० ई. निघतांना त्‍या व्‍यक्‍तीने पू. आईंना आशीर्वाद देणे, निरोप देतांना ती व्‍यक्‍ती जागेवरच अदृश्‍य होणे आणि त्‍या वेळी ‘साक्षात् दत्तात्रेयांनीच भेट दिली’, असे जाणवून पू. आईंची भावजागृती होणे : त्‍यांनी पक्ष्यांसाठी दारात झाडाला अडकवलेली ज्‍वारीची कणसे पाहिली आणि सांगितले, ‘‘ही कणसे या झाडाला न अडकवता दुसर्‍या झाडाला अडकवा आणि तिथे पक्ष्यांना पाणी पिण्‍यासाठी एक लोटके (मातीचे भांडे) अडकवा, म्‍हणजे पक्षी खाऊन अन् पाणी पिऊन तृप्‍त होतील.’’ हे सर्व सांगून ती व्‍यक्‍ती निघू लागली. तिने पू. आईंना आशीर्वाद दिला, ‘‘तुमचे आणि तुमच्‍या मुलींचे चांगले होईल.’’ त्‍यांना निरोप देण्‍यासाठी पू. आई घराचे दार लावून घेण्‍यास वळल्‍या आणि दार लावल्‍यावर पहातात, तर काय ? ती व्‍यक्‍ती त्‍यांना जागेवरच अदृश्‍य झाल्‍याचे दिसले. त्‍या वेळी त्‍यांची पुष्‍कळ भावजागृती झाली. ‘मला साक्षात् दत्तात्रेयांनीच भेट दिली’, असे पू. आईंना जाणवले.’

(क्रमशः)

– श्रीमती इंदुबाई भुकन (पू. लोखंडेआजींची मुलगी, आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ५८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक