बारसू (राजापूर) परिसरात जमावबंदी असतांनाही ग्रामस्थांनी एकत्रित होऊन केला विरोध !

रिफायनरीच्या प्रकल्पाच्या मातीचे सर्वेक्षण !

राजापूर तालुक्यातील रिफायनरीच्या प्रकल्प

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथे रिफायनरीच्या प्रकल्पाच्या मातीचे सर्वेक्षण २४ एप्रिल या दिवशी करण्याचे नियोजित होते. यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. सर्वेक्षणाच्या ठिकाणापासून १ कि.मी. परिसरात प्रशासनाने ३१ मेपर्यंत जमावबंदी केली आहे. या सर्वेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला असून त्याविरोधात घोषणा दिल्या. तथापि हे सर्वेक्षण चालू झाले कि नाही ? याविषयी सायंकाळपर्यंत नागरिकांमध्ये संभ्रम होता.

(सौजन्य : Saam TV)  

या प्रकरणी रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील काही नेते भूमीगत आहेत. पोलिसांनी २३ एप्रिलच्या रात्री सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण या प्रकल्पविरोधी नेत्यांना कह्यात घेतले असून त्यांना २५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशाही परिस्थितीत सत्यजित चव्हाण यांनी प्रकल्पाला विरोध करणार्‍या आंदोलकांना एका चिठ्ठीवर ‘जमीन धरून रहा, आर या पार’, असा संदेश लिहून पाठवला आहे.

कशेळी येथे पोलिसांच्या गाडीला अपघात

रिफायनरी प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाच्या बंदोबस्तासाठी जाणार्‍या पोलिसांच्या गाडीला कशेळी येथे अपघात झाला. या अपघातात १७ पोलीस घायाळ झाले आहेत. घायाळ पोलिसांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

(सौजन्य : Zee 24 Taas)  

आंदोलनकर्त्यांना होत आहे उष्माघाताचा त्रास

प्रकल्पासाठी स्थानिकांचा जोरदार विरोध असून याविषयी करण्यात आलेल्या आंदोलनात काही महिलांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे. या वेळी एका महिलेला उष्माघाताचा त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यासाठी नेण्यात येत होते; मात्र तिने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा काही वेळाने आणखीही महिलांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला. त्यानंतर या महिलांना सावलीत नेण्यात आले. ‘जीव गेला तरी चालेल; मात्र आंदोलन सोडून जाणार नाही’, अशी भूमिका या महिलांना घेतली.

प्रशासकीय अधिकार्‍यांची आंदोलनकर्त्यांशी चर्चा

बारसूच्या माळरानावर रिफायनरी विरोधक शेकडोंच्या संख्येने जमले होते. प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाविषयी स्थानिक ग्रामस्थांची चर्चा करण्यासाठी महसूल अधिकारी, राजापूरचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी बारसू गावात आले, त्यांनी ग्रामस्थांशी चर्चाही केली; मात्र या वेळी ’ग्रामपंचातीमध्ये प्रकल्पाच्या विरोधात ठराव झालेला असतांना प्रकल्प का करताय ?’, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी अधिकार्‍यांना विचारण्यात आला.