२५ एप्रिल ते १० मे या कालावधीत प्रतिदिन ५ घंटे परशुराम घाट वाहतुकीस बंद !

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम

परशुराम घाटातील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद रहाणार

रत्नागिरी – चिपळूण जवळील परशुराम घाटातील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी घाटातील वाहतूक २५ एप्रिल ते १० मे २०२३ या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद रहाणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी २० एप्रिलला रात्री दिला. या कालावधीमध्ये अल्प भारमान असणार्‍या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूण या पर्यायी मार्गाकडे वळवण्यात आली आहे.

(सौजन्य : Times Now Marathi) 

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर मासापर्यंत पूर्ण करायचे असल्याने हे काम जलद गतीने केले जात आहे. परशुराम घाट हा ५.४० किलोमीटर लांबीचा असून, त्यापैकी ४.२० किमी लांबीच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे; मात्र १.२० किमी भाग हा डोंगररांगा आणि खोल दरी यांचा आहे. त्यामुळे या भागातील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अवघड आहे. त्यामुळे ‘हे काम करतांना घाट वाहतुकीसाठी २७ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा’, अशी मागणी कशेडी परशुराम हायवे प्रा. लि. या नियुक्त ठेकेदाराने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. रत्नागिरी विभागासह येथे कार्यरत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण – रायगड यांनीही अशी मागणी केली होती. आता जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी हा घाट बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.