‘गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने सप्टेंबर २०२२ मध्ये सनातनच्या ६३ व्या संत पू. सुशीला मोदी (वय ७२ वर्षे) देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रात रहायला आल्या होत्या. पू. मोदीभाभींच्या कृपेने मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मी त्यांच्या चरणी अर्पण करते.
१. प्रेमभाव
अ. रात्रीच्या वेळी मला आध्यात्मिक त्रास होत असतांना पू. मोदीभाभी ‘मी झोपण्यापूर्वी नामजपाचे मंडल केले आहे का ? नामजप केला का ?’, यांकडे लक्ष देत होत्या.
आ. मला ९ घंटे नामजपादी उपाय सांगितले होते. ‘माझे उपाय पूर्ण होत आहेत का ?’, याचा त्या दिवसभरात अधूनमधून माझा आढावाही घेत होत्या. पू. मोदीभाभींच्या कृपेनेच मी नामजपादी उपाय पूर्ण करू शकत होते.
इ. ‘माझी प्रकृती बरी नाही’, हे माझ्या आईला समजल्यावर मला तिचा भ्रमणभाष आला. तिला माझी काळजी वाटत होती. त्या वेळी पू. मोदीभाभी स्वतः तिच्याशी बोलल्या आणि ‘भगवंत सर्वकाही ठीकच करणार आहे’, असे त्यांनी आईला सांगितले. त्यामुळे माझ्या आईला पुष्कळ आधार वाटला.
२. शिकण्याची वृत्ती
पू. मोदीभाभी यांना अध्यात्मप्रचाराचा पुष्कळ अनुभव आहे. आम्हा सर्वांसाठी त्या आदर्श आहेत. आम्हीच त्यांच्याकडून शिकतो, तरीही पू. मोदीभाभी आम्हाला विचारत होत्या, ‘‘तुम्ही प्रचार करतांना काय काय सांगता आणि कसे प्रयत्न करता ? ’’
३. साधकांच्या साधनेची तळमळ
पू. मोदीभाभी वैयक्तिक कामे स्वतःच करतात, उदा. कपडे धुणे, कपड्यांना इस्त्री करणे इत्यादी. एकदा मी त्यांना प्रार्थना केली, ‘जर आपण मला या सेवा करायला अनुमती दिलीत, तर मी या सेवा नामजप करत करीन.’ तेव्हा त्या मला सेवा करायला देऊ लागल्या. त्यांची कोणतीही सेवा करण्यापूर्वी ‘मी नामजप करतच ही सेवा करीन’, असे सांगितल्यावरच त्या मला सेवा देत असत.
४. अहंशून्यता
पू. मोदीभाभी सकाळी सेवाकेंद्रात होणार्या सत्संगाला उपस्थित असायच्या. सत्संगात साधक स्वतःकडून झालेली चूक सांगत असत. पू. मोदीभाभीही त्या साधकासह सेवेत सहभागी असल्या, तर त्या ‘ती माझीही चूक आहे’, असे सांगायच्या. प्रत्यक्षात
पू. भाभींकडून कोणतीच चूक होत नसे. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करण्यात आम्ही साधक न्यून पडत होतो. या प्रसंगात ‘इतरांनी सांगितलेल्या चुकांमध्ये मी कुठे चुकले ?’, याकडे लक्ष देऊन ती चूक स्वतः स्वीकारावी’, हे माझ्या लक्षात आले.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
पू. मोदीभाभींनी माझ्या लक्षात आणून दिले, ‘हे प्रारब्ध भोगून संपवण्यासाठी आपल्याला कित्येक जन्म घ्यावे लागले असते; परंतु ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपले सर्व प्रारब्ध याच जन्मात नष्ट करत आहेत’, याबद्दल आपल्याकडून त्यांच्याप्रती केवळ कृतज्ञताच व्यक्त व्हायला पाहिजे.’
६. अनुभूती
अ. पू. मोदीभाभी देहली सेवाकेंद्रात आल्या. तेव्हा माझी शारीरिक स्थिती बरी नव्हती. त्यामुळे माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. मी केवळ २ दिवस पू. मोदीभाभी रहात असलेल्या खोलीत झोपल्यामुळे माझे मन सकारात्मक झाले.
७. पू. सुशीला मोदी यांच्या देहात जाणवलेले पालट
१. पू. मोदीभाभींची त्वचा लहान मुलासारखी कोमल आणि मऊ आहे.
२. गुरुदेवांच्या कृपेने एकदा मला पू. मोदीभाभींच्या डोक्याला तेल लावून त्यांचे केस विंचरण्याची संधी मिळाली. ‘पू. मोदीभाभींचे केस अत्यंत मऊ आणि सोनेरी झालेले असून त्यांच्या केसांमधून दिव्य तेज प्रक्षेपित होत आहे’, असे मला दिसले.
मला गुरुदेवांच्या परम कृपेमुळेच पू. मोदीभाभी यांचा सहवास लाभला. ‘पू. मोदीभाभींना अपेक्षित असलेले गुरुसेवा करण्याचे प्रयत्न माझ्याकडून करून घ्यावेत’, अशी मी पू. मोदीभाभी आणि गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या श्री चरणी प्रार्थना करते.’
– कु. पूनम चौधरी, देहली (२३.१०.२०२२)
इथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |