२०.४.२०२३, म्हणजे चैत्र अमावास्या या दिवशी अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील सनातनचे १०७ वे समष्टी संत पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद यांची द्वितीय पुण्यतिथी झाली. रुग्णाईत असतांना एकदा पू. (डॉ.) वेद यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. या सत्संगात त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
१. प्रकृती बरी नसतांना ‘अधिकाधिक नामजप करणे’, हीच साधना आहे !
डॉ. नंदकिशोर वेद (आताचे (पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद) : सध्या मी ज्या परिस्थितीत आहे, त्यामध्ये साधनेत आणखी पुढे जाण्यासाठी मी काय करू शकतो ? (सत्संग झाला, त्या वेळी डॉ. नंदकिशोर वेद कर्करोगाने रुग्णाईत होते.)
परात्पर गुरु डॉ. आठवले : एकच मार्ग आहे. तो म्हणजे अखंड भगवद्स्मरण, नामजप ! तुम्ही शरिराने काही करू शकत नाही. अध्यात्मात बुद्धीचे तर काही कामच नाही. मनाचेच काम असते आणि ते म्हणजे नामजप करणे !
डॉ. नंदकिशोर वेद : ईश्वराच्या कृपेने ते सर्व प्रयत्न चालू आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : जेव्हा आपण नामजप करू शकत नाही, तेव्हा ध्वनीमुद्रित नामजप (ऑडिओ) लावून ठेवावा.
२. डॉ. नंदकिशोर वेद यांना आलेल्या अनुभूती
परात्पर गुरु डॉ. आठवले : एवढ्या मासांमध्ये आपल्याला काही अनुभूती आल्या आहेत का ?
डॉ. नंदकिशोर वेद : गुरुदेव, पुष्कळ अनुभूती आल्या आहेत. एक-एक क्षण ही अनुभूतीच आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : १ – २ सांगा ना !
२ अ. ईश्वराच्या कृपेमुळे उतारवयातही केमोथेरेपीचा कोणताही त्रास न होणे
डॉ. नंदकिशोर वेद : रुग्णालयात माझ्यावर केमोथेरेपी (टीप) चालू असतांना तेथील प्रमुख आधुनिक वैद्य, त्यांचे साहाय्यक आधुनिक वैद्य आणि परिचारिका पुनःपुन्हा येऊन मला विचारतात, ‘‘आपल्याला काही त्रास होत नाही ना ? उलटी येत नाही ना ? चक्कर येत नाही ना ?’’ तेव्हा मी म्हणतो, ‘‘नाही.’’ पुन्हा अर्ध्या घंट्यानंतर आधुनिक वैद्य मला विचारतात, ‘‘आपल्याला काही त्रास होत नाही ना ?’’ तेव्हा मी म्हणतो, ‘‘नाही.’’ त्या वेळी त्यांना असे आश्चर्य वाटते, ‘यांना काही त्रास होत कसे नाहीत ? अशा रुग्णांना पुष्कळ त्रास होतात.’
टीप – केमोथेरेपी : कर्करोगावर करण्यात येत असलेली एक आधुनिक औषधोपचार पद्धत.
एकदा आमचे प्रमुख आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘आपल्यावर ईश्वराची पुष्कळ कृपा असल्यामुळे आपल्याला या वयातही (वयाच्या ६८ व्या वर्षीही) केमोथेरेपीचा काही त्रास होत नाही. आपल्यापेक्षा अल्प वयाचे लोक येतात. त्यांना पुष्कळ त्रास होतात. त्यामुळे आम्हाला केमोथेरेपी थांबवावी लागते.’’
२ आ. केमोथेरेपीनंतर केलेल्या अस्थिमज्जेच्या चाचणीचा (‘बोन मॅरो बायॉप्सी’चा) अहवाल चांगला येणे आणि त्याबद्दल आधुनिक वैद्यांनी आश्रमातील साधकांचे आभार मानणे
डॉ. नंदकिशोर वेद : दोन मासांनंतर आधुनिक वैद्यांनी पुन्हा माझी ‘बोन मॅरो बायोप्सी’ (अस्थिमज्जेची एक चाचणी) करून घेतली. त्या चाचणीचा अहवाल त्यांनी मला पाठवला होता. त्यात त्यांनी लिहिले होते, ‘तुमचा अहवाल चांगला आला आहे. मी आश्रमातील सर्व सदस्यांचे आभार मानतो.’ ईश्वराच्या कृपेने असे आधुनिक वैद्य मला मिळाले. त्यांनाही जाणवत असावे, ‘मी रामनाथी आश्रमात रहातो, तर आश्रमाचा काहीतरी प्रभाव माझ्यावर होत आहे.’
परात्पर गुरु डॉ. आठवले : आश्चर्य आहे !
३. स्वयंसूचना दिल्यानंतर अंतर्मनातील संस्कार नष्ट होतात !
डॉ. नंदकिशोर वेद : सध्या माझ्या शारीरिक स्थितीमुळे प्रयत्न करूनही माझ्याकडून स्वयंसूचना सत्रे होत नाहीत. (हा सत्संग झाला, त्या वेळी डॉ. वेद कर्करोगाने रुग्णाईत होते.) मध्यंतरी जुलैमध्ये माझे स्वास्थ्य फारच बिघडले होते. तेव्हा माझे स्वयंसूचना देणे पूर्णतः बंद झाले होते. त्यापूर्वी माझी ६ स्वयंसूचना सत्रे होत होती. आता अलीकडेच मी पुन्हा स्वयंसूचना द्यायला आरंभ केला आहे. मी स्वयंसूचना सत्रे करण्याचा प्रयत्न करत आहे. आता २ – ३ च स्वयंसूचना सत्रे होऊ शकत आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : जसजसा काळ पुढे जाईल, तसतसे अंतर्मनातील अनेक जन्मांचे विचार हळूहळू न्यून होत जातील. ‘काही समस्याच नाही’, असे बुद्धीला सांगून कधी प्रश्न दूर होत नसतात. स्वयंसूचना दिल्यानंतरच ते जातात. आपण याचा प्रयत्न करून अनुभव घ्यावा.
डॉ. नंदकिशोर वेद : जेव्हा मी एखादी सेवा करतो, तेव्हा माझ्या मतानुसार ती चांगली झालेली असते. त्या वेळी त्वरित माझ्या मनात विचार येतो, ‘मी चांगली सेवा केली आहे. मी चांगली सेवा करतो’ आणि ते त्वरित माझ्या लक्षात येते. नंतर मी ‘हे विचार मनात टिकून राहू नयेत. ते त्वरित नष्ट होऊ देत’, अशी प्रार्थना करतो आणि त्यासाठी स्वयंसूचनाही देतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : त्यासाठी आणखी एक करावे. जेव्हा असा विचार मनात येईल, तेव्हा त्वरित स्वतःला चिमटा काढावा. ही स्वयंसूचना पद्धत ‘इ २ (क)’ आहे. त्याने काय होते ? या विचारामुळे वेदना होतात, तर त्या विचाराला मनात येऊच द्यायचे नाही. ते विचार मनात येणे बंद होईल; कारण शरीर आणि मन यांना वेदना नको असतात. हा उत्तम उपाय आहे. त्याचे अल्प वेळेतच परिणाम मिळतात.’ (सप्टेंबर २०२०)
(हे लिखाण पू. (कै.) डॉ. वेद संत होण्यापूर्वीचे असल्याने त्यात त्यांना ‘पू.’ लावण्यात आलेले नाही.)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |