ब्रिटनमधील शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर मुसलमान विद्यार्थ्यांकडून धर्मांतरासाठी धमक्या !

  • हिंदु विद्यार्थावर गोमांस फेकले !

  • देवतांचाही केला जातो अवमान !

  • १ टक्का शाळांकडूनच घेतली जाते नोंद !

लेस्टर येथील दंगल

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांचा मुसलमान विद्यार्थ्यांकडून छळ केला जात आहे. ‘जर हा छळ थांबवायचा असेल, तर इस्लाम धर्म स्वीकारा’, असे या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत असल्याचे एका पहाणीतून आढळून आले आहे. ‘हेन्री जॅक्सन सोसायटी’ने ही पहाणी केली आहे. शार्लोट लिटलवुड यांनी या पहाणीचा अहवाल सिद्ध केला आहे. पहाणीत ९८८ हिंदु पालकांशी संवाद साधण्यात आला, तर ब्रिटनमधील अनुमाने १ सहस्र शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. ५० टक्के हिंदु पालकांनी सांगितले, ‘त्यांच्या मुलांना शाळांमध्ये द्वेषाचा सामना करावा लागतो.’ ब्रिटनमध्ये हिंदु हा तिसरा मोठा धर्म आहे. ब्रिटनमध्ये १० लाखांहून अधिक हिंदू रहातात.

अहवालात म्हटले आहे की, ब्रिटीश शाळांमध्ये हिंदु धर्माविषयी अत्यंत अल्प ज्ञान दिले जाते. येथे शिकवल्या जाणार्‍या धार्मिक शिक्षणात हिंदु धर्माची खिल्ली उडवली जाते. त्यामुळे हिंदु मुलांच्या पालकांनी ब्रिटीश शाळांवर टीका केली आहे.

ब्रिटनमधील लेस्टर आणि बर्मिंघम या शहरांमध्ये हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या हिंदुविरोधी दंगलीनंतर लेस्टर पोलिसांनी ५५ धर्मांध मुसलमानांना अटक केली. मालमत्तेची हानी करणे, तसेच मंदिरे आणि हिंदु यांच्यावर आक्रमण  करणे, असे त्यांच्यावर आरोप आहेत. शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांशी भेदभाव करण्याच्या घटना आणि लेस्टरमधील हिंदूंवरील हिंसाचार, यांत साम्य आहे.

हिंदु विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे होतात अत्याचार !

१. गोमांसावरून हिंदूंचा अपमान केला जातो आणि शाकाहारी असल्यावरून त्यांची चेष्टा केली जाते. हिंदूंच्या देवतांचाही अपमान केला जातो. एका शाळेत एका हिंदु विद्यार्थिनीच्या वर्गमित्रांनी तिच्या अंगावर गोमांस फेकले.

२. भारतात मुसलमानांवर भेदभाव होत असल्याचा आरोप करून ब्रिटनमधील हिंदु विद्यार्थ्यांचा द्वेष केला जातो. हिंदु विद्यार्थ्यांना ‘काफीर’ संबोधून त्यांचा अपमान केला जातो. त्यांना ‘मुसलमान हो, अन्यथा तुमचे जीवन नरक बनवू’, अशी धमकी दिली जाते.

३. एका हिंदु विद्यार्थ्याला सांगण्यात आले, ‘तुला स्वर्गात जायचे असेल, तर इस्लाममध्ये ये, नाहीतर तू जगणार नाहीस.’ तसेच इस्लामी धर्मोपदेशकांचे व्हिडिओ दाखवून एका विद्यार्थ्याला धर्मांतर करण्यासही सांगण्यात आले.

४. भारतात पंतप्रधान मोदी यांचा उदय आणि कलम ३७० रहित झाल्यानंतर ब्रिटनमध्ये अनेक मुसलमान विद्यार्थी हिंदु विद्यार्थ्यांना ‘तुम्ही आमची मशीद का पाडता ?, आमच्यावर का आक्रमण का करता?’ असे प्रश्‍न विचारतात. आतंकवाद्यांचा आदर्श असणारा झाकीर नाईक याचे व्हिडिओ पाहून धर्मांतर करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात असल्याचे पालकांनी म्हटले आहे.

५. भारतातील जातीव्यवस्था आणि देवतांच्या पूजेविषयी अनेक अपसमज पसरवून त्या आधारावर हिंदु विद्यार्थ्यांचा अपमान केला जातो. त्यांना दिवाळीची सुट्टीही दिली जात नाही.

६. हिंदू विद्यार्थ्यांना ब्रिटीश मुले ‘पाकी’ म्हणतात. ब्रिटीश शाळांमध्ये हिंदुविरोधी अपशब्दांचा वापर सामान्य मानला जातो.

७. केवळ १ टक्के शाळा अशा आहेत ज्यांनी हिंदु विद्यार्थ्यांवरील अशा प्रकारच्या अत्याचारांची नोंद घेतली आहे.

संपादकीय भूमिका

  • इस्लामी देशच नव्हे, तर आता ब्रिटनसारख्या ‘पुरोगामी’ देशातही हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून अशा प्रकारे अत्याचार होणे, हे गंभीर आहे. या संदर्भात हिंदूंच्या जागतिक संघटना आणि भारत सरकार यांनी आवाज उठवणे आवश्यक आहे !
  • ब्रिटनच्या शाळांमध्ये घडणार्‍या घटना उद्या भारतातील शाळांमध्येही घडू लागल्या, तर आश्‍चर्य वाटू नये !