१९.४.२०२३ या दिवशी कै. मोहन केशव बेडेकर यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
८.४.२०२३ या दिवशी रत्नागिरी येथील मोहन बेडेकर यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. १९.४.२०२३ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. वडिलांनी साधना चालू केल्यानंतर त्यांच्यात झालेला पालट आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !
‘बाबा (मोहन बेडेकर) साधनेत यायच्या आधी त्यांचे मन फार अस्वस्थ असायचे. त्यांच्या मनात अनेक विचार येत असत. ‘मनुष्य जन्मामध्ये व्यावहारिक जीवन जगत असतांना संसार करायचा, कुटुंब सांभाळायचे, मुलांचा सांभाळ करायचा, वगैरे वगैरे … इतकंच करायचं का ? हेच मनुष्याचे आयुष्य असते का ?’, असे विचार त्यांच्या मनात येऊन ते झोपेतून उठून बसायचे. ते अस्वस्थ व्हायचे. त्यांना अशा विचारांचा त्रास होत असे.
एकदा आमच्या घरी २ साधक आले आणि त्यांनी ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’मधून आलो आहोत’, असे सांगितले. (तो प्रसंग अजूनही माझ्या स्मरणात आहे.) नंतर आई-बाबा (श्रीमती मंजिरी बेडेकर आणि कै. मोहन बेडेकर) दोेघेही सत्संगात जाऊ लागले आणि त्यांचा साधनेचा प्रवास चालू झाला. साधनेत आल्यानंतर बाबांना मनुष्यजन्माचे खरे उद्दिष्ट समजले आणि कालांतराने बाबांच्या मनात येणारे विचार थांबले.
बाबांच्या मनातील विचार परात्पर गुरु डॉ. आठवले यांना बाबा साधनेत नसतांनाही समजलेे. त्यांनीच आमच्या घरी साधक पाठवले आणि आजपर्यंतचा सगळा प्रवास घडवून आणला. ‘ईश्वराने आमच्यावर अपार कृपा केली. ईश्वर सगळ्यांचा सांभाळ करत आहे’, त्याबद्दल ईश्वराच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.
२. वडिलांचे निधन होण्यापूर्वी जाणवलेली सूत्रे
अ. माझ्या मनात काही मासांपासून पुढील विचार येत होते, ‘कठीण प्रसंगांना कधी ना कधी सामोरे जावे लागू शकते. त्या वेळी परिस्थिती कशी सांभाळायची ? माझ्यात त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता नाही. आपण अशा परिस्थितीमध्ये कसे तरणार ?’ अलीकडे माझ्या मनातील या विचारांची तीव्रता वाढली होती.
आ. गेल्या मासात मी माझ्या एका साधक मित्राला म्हणालो होतो, ‘‘माझे बाबा सेवेच्या संदर्भात इतके धडपड करत आहेत, तर त्यांची याच जन्मात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होऊ दे.’’ त्या वेळी माझे डोळे भरून आले होते. (‘माझ्या मनात असे विचार का येत आहेत ?’, हे त्या वेळी माझ्या लक्षात येत नव्हते. ते आता माझ्या लक्षात आले.)
३. वडिलांचे निधन झाल्यानंतर झालेली मनाची स्थिती
अ. बाबांचे निधन झाल्यानंतर पहिले ३ दिवस मला पुष्कळ मानसिक त्रास झाला. ३ दिवसांनंतर माझे मन शांत झाले. माझ्या मनातील विचार न्यून झाले.
आ. प्रत्येक कृती करत असतांना माझा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव जागृत होण्याचे प्रमाण वाढले होते.
इ. आजपर्यंत ईश्वराचे आशीर्वाद आमच्या कुटुंबियांच्या समवेत होते. यापुढेही ईश्वर आमच्या कुटुंबियांच्या समवेत असणार आहे. ‘आमचे सतत देवाशी अनुसंधान असू दे’, अशीच देवाला प्रार्थना आहे.
ई. काही वर्षांपूर्वी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्यासाठी काही दिवस गेलो होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी निवास करत असलेल्या खोलीत बसून नामजप करत असतांना माझ्या मनात विचार आले, ‘परम पूज्य माझ्याशी का बोलत नाहीत ? माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोचत असेल ना ?’ तेव्हा माझ्याकडून आर्ततेने प्रार्थना झाली, ‘परम पूज्य, तुम्ही मला मार्गदर्शन करा. मला तुमचा आवाज ऐकू का येत नाही ? माझ्याकडून काय चूक होत आहे ? माझे मन तुमच्या जवळ राहू दे.’ त्याच क्षणी मला सूक्ष्मातून दिसले, ‘परम पूज्य आसंदीवर बसून लिहीत आहेत. नंतर त्यांनी लेखणी खाली ठेवली. त्यांनी माझे बोट धरले आणि ते मला म्हणाले, ‘माझ्या समवेत चल.’
(ते मला दिसले, माझ्याशी बोलले. हे सगळे मनातल्या मनात घडत होते. मला असा आनंद कधीच अनुभवता आला नव्हता.) तेव्हा बराच वेळ माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.
या अनुभूतीनुसार परमेश्वराने बाबांना त्याच्या समवेत नेले आहे. पुढील लोकातील जी सेवा बाबांना नेमून दिली असेल, त्याची व्याप्ती कदाचित् आज ते समजून घेत असतील. बाबा ती सेवाही चांगल्या प्रकारे करून आणखी पुढच्या लोकाच्या दिशेने प्रवास करतील.’
– श्री. मंगेश मोहन बेडेकर ((कै.) मोहन बेडेकर यांचा मुलगा), रत्नागिरी (१४.४.२०२३)
|