गडदुर्गांवरील पर्यटनापेक्षा त्यांचे जतन- संवर्धन अधिक महत्त्वाचे ! – छत्रपती संभाजीराजे

पुणे येथील ‘माझं गडप्रेम’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

छत्रपती संभाजीराजे  (डावीकडून चौथे  )

पुणे – भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्यानंतरही राज्यातील गडदुर्गांकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. सर्व राजकीय पुढारी केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडदुर्ग यांची नावे घेतात; मात्र प्रत्यक्षात त्यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी कुणीच काही प्रयत्न करत नाही. सरकारची गडांच्या संदर्भातील ‘दत्तक योजना’ ही केवळ पर्यटन वाढवण्यासाठी आहे; मात्र गडदुर्गांवरील पर्यटनापेक्षा त्यांचे जतन-संवर्धन करणे हे आवश्यक आणि तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे यांनी येथे केले. ते १६ एप्रिल या दिवशी साहाय्यक पोलीस आयुक्त सूरज गुरव लिखित आणि ‘बायफोकल्स पब्लिकेशन्स’च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘माझं गडप्रेम’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी बोलत होते.

संभाजीराजे पुढे म्हणाले की, रायगडाच्या संवर्धनासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली; मात्र नोकरशाहीच्या विविध जटील नियमांमध्ये गडदुर्गांचे जतन आणि संवर्धन अडकून पडले आहे. इतिहासाला कोणतीही बाधा न पोचता संवर्धन झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

लेखक सूरज गुरव म्हणाले, ‘‘या पुस्तकामध्ये मी महाराजांचा अप्रकाशित इतिहास आणि घटना यांचा अधिकाधिक समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे.’’