‘स्वतःला महत्त्व मिळावे’, असे वाटणे’, या अहंच्या पैलूमुळे ‘सहसाधक माझे ऐकत नाहीत अथवा उत्तरदायी साधक माझे मत विचारात घेत नाहीत’, असे काही साधकांना वाटते आणि त्यांच्या नकारात्मकतेत वाढ होते. अहंच्या या विचारांमुळे साधकांवर ‘सेवा करतांना स्वतःला मर्यादा घालून घेणे, सेवेमध्ये मनापासून सहभागी न होणे, दायित्व घेऊन सेवा करणे नकोसे वाटणे’, असे परिणाम होत असल्याचे लक्षात येते.
साधनेमध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘साधनेत आपल्या मनाची विचारप्रक्रिया योग्य दिशेने होत आहे ना ?’, याचे अंतर्मुखतेने चिंतन करणे आवश्यक असते.
१. मनातील शंका दायित्व असणार्या साधकांना विचारणे
२. त्यांनी सांगितलेले व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न ऐकणे
३. त्यांनी दिलेला निर्णय मनापासून स्वीकारणे
४. ‘गुरु आपल्याला कशा प्रकारे अंतर्मुख करत आहेत ?’, हे शिकणे
५. प्रयत्नांचा आढावा देणे
या पंचसूत्रीप्रमाणे श्रद्धेने साधनेचे प्रयत्न केल्यास अंतर्मुखता निर्माण होऊन साधकाची आध्यात्मिक प्रगती होते.
साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित अन् गांभीर्याने करून वेळीच अयोग्य विचारांवर मात करावी, तसेच अंतर्मुखता निर्माण होण्यासाठी उत्तरदायी साधकांशी बोलून स्वयंसूचना द्याव्यात.
साधकांनो, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी सतर्कतेने अन् तळमळीने प्रयत्न करून आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२३)