पुणे येथे शासकीय कामकाज मराठीतूनच होणार !

मराठी भाषेच्या व्यवहारासंदर्भात तक्रार असल्यास कारवाई करणार ! – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे – महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ अन्वये शासकीय कामकाज पूर्णपणे मराठी भाषेतून करणे आवश्यक असून त्यासाठी सर्व विभागांनी मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबवावेत. प्रत्येक कार्यालयात मराठी भाषा अधिकारी नेमण्यात आले असून शासकीय कार्यालयात मराठी भाषेतील व्यवहारासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास कळवाव्यात. त्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा मराठी भाषा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

राज्य शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर ज्याप्रमाणे बंधनकारक आहे, त्याचप्रमाणे त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालयांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. मराठी भाषेला उत्तेजन देण्यासाठी शासनाच्या निर्देशांवर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, तसेच मराठी भाषादिनानिमित्त प्रतीवर्षी उपक्रम राबवण्यात येत आहेत, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

‘प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा समिती गठित केली असून त्या समितीमध्ये कला, साहित्य, संस्कृती आणि प्रकाशने या क्षेत्रांत काम करणाऱ्या, तसेच जिल्ह्यात रहाणाऱ्या व्यक्तींमधून दोन प्रतिनिधींची नावे नामनिर्देशित केली जातील’, असे उपजिल्हाधिकारी नाटेकर यांनी सांगितले.

मराठीतील लुप्त होणारे शब्द आणि त्यांचे चित्र अन् माहिती असे पुस्तक सिद्ध केल्यास पुणे जिल्ह्याचा वेगळा उपक्रम होईल. या पुस्तकाचा पुढील पिढीला उपयोग होईल, असे शासकीय माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी सांगितले.