सर्व साधकांना अनुभूतीतून आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीच्या मार्गिकेतील दिव्याचा खिडकीच्या काचेतून दिसणारा प्रकाश सुदर्शन चक्राप्रमाणे दिसून त्यामध्ये तार्याचा आकार स्पष्ट दिसणे
‘वर्ष २०२२ मध्ये एकदा रात्री मी महाप्रसाद (भोजन) घेतल्यानंतर सेवेच्या ठिकाणी चालले होते. मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) खोलीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या मार्गिकेतून जात होते. तेव्हा सहज माझे लक्ष गुरुदेव रहात असलेल्या खोलीकडे गेले. खोलीचे दार आणि खिडकी बंद होती, तरीही मला खोलीतील मार्गिकेच्या दिव्याचा प्रकाश दिसला. एरव्ही अन्य खोलीतील खिडकीच्या काचेतून बाहेर दिसणारा प्रकाश साधारण वर्तुळाकार दिसतो. तो दिव्याच्या प्रकाशाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा दिसतो अन् थोडा अस्पष्ट दिसतो; मात्र गुरुदेवांच्या खोलीच्या खिडकीच्या काचेतून दिसणारा प्रकाश सुदर्शन चक्राप्रमाणे आणि सुस्पष्ट दिसला. मला त्या सुदर्शनचक्रात तार्याचा आकारही दिसला.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीच्या दारावर असलेल्या काचेवर सप्तरंगी पट्टा दिसणे
८.२.२०२३ या दिवशी दुपारी ४.३० वाजता मी गुरुदेवांच्या खोलीच्या दाराकडे पाहिले. दारावर असणार्या ४ काचांपैकी खालच्या बाजूला असलेल्या एका काचेवर मला साधारण ३ इंच जाडीचा सप्तरंगांचा आडवा पट्टा दिसला. मी कुतुहलाने त्या दारावरील अन्य काचांकडे पाहिले, तेव्हा त्या काचांपैकी खालच्या बाजूच्या दुसर्या काचेवर मला पर्वताच्या आकाराप्रमाणे साधारण दीड इंच जाडीचा सप्तरंगी पट्टा दिसला.
या दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण घटना पाहून मला गुरुदेवांच्या प्रती अत्यंत कृतज्ञता वाटली.’
– अश्विनी कुलकर्णी, ढवळी, फोंडा, गोवा. (१२.२.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |