‘२३ मार्च २०२३ या दिवशी सूरत न्यायालयाने काँग्रेसचे खासदार राहुल गांधींना शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांचे संसद सदस्यत्व म्हणजेच खासदारकी रहित झाली. याविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते देशभर आंदोलने करत आहेत. अशाच एका आंदोलनाच्या वेळी तमिळनाडू येथील काँग्रेसचे जिल्हाप्रमुख मणिकंदन यांनी ‘काँग्रेसची सत्ता आल्यास राहुल गांधींना शिक्षा सुनावणार्या न्यायाधिशांची जीभ कापू’, असे फुत्कार टाकले आहेत. ‘म. गांधींच्या ‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ या तत्त्वांना त्यांचेच अनुयायी हरताळ फासतात’, हे वेळोवेळी लक्षात येते. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसवाल्यांनी जेव्हा जेव्हा आंदोलने केली, ती हिंसकच होती. काँग्रेसचे कार्यकर्ते जेव्हा आंदोलन करतात, तेव्हा हिंसाचार होतोच होतो. केवळ काँग्रेसच नव्हे, तर तिच्यामधून फुटून नवीन बिर्हाड थाटलेले अन्य पक्ष म. गांधींचे नाव घेतात आणि त्यांच्या आंदोलनांच्या वेळीही हिंसाचार होतोच. याला अपवाद केवळ मराठा क्रांती मोर्च्यांचा होता. त्यांच्या आंदोलनाला लाखो लोक आले; परंतु कुठेही हिंसेचे गालबोट लागले नाही. म. गांधींचा वध नथुराम गोडेसेंनी केला. पुरोगाम्यांकडून नेहमी उद्घोष केला जातो, ‘व्यक्ती मेल्याने तिचे विचार मरत नाहीत.’ असे असतांना त्यांचे विचार मारण्याचे पाप त्यांच्या अनुयायांनीच (काँग्रेसवाल्यांनीच) केले. काँग्रेसवाल्यांनी म. गांधींना शासकीय कार्यालयांतील भिंतींवर छायाचित्रांमध्ये ठेवून त्यांच्या तत्त्वांना तिलांजली दिली आहे. जेव्हा कुणी काँग्रेसच्या नेत्यांवर टिका करतो, तेव्हा त्याच्या विरोधात केली जाणारी आंदोलने हिंसकच असतात. यासाठीच देश स्वतंत्र झाल्यानंतर म. गांधींनी काँग्रेसचे विसर्जन करण्याचा समादेश (सल्ला) दिला होता. तो न मानल्याने गांधींच्या तत्त्वांची दुर्दशा झालेली पहायला मिळते आहे. हे म. गांधींच्या कुणाही अनुयायाच्या लक्षात येत नाही, ही त्यांची शोकांतिकाच आहे.’
– श्री. धैवत विलास वाघमारे, रामनाथी, गोवा. (९.४.२०२३)