रत्नागिरी-८ बी ही भाताची नवीन जात विकसीत : महाराष्ट्रासह ६ राज्यांत मागणी

शिरगाव (रत्नागिरी) कृषी संशोधन केंद्राचे यश !


रत्नागिरी – कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या अंतर्गत तालुक्यातील शिरगाव कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या रत्नागिरी-८ ही भाताची जात कोकणासह देशभरातील उत्तरप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या ६ राज्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरून शिफारस केली जात आहे, तसेच देशातील काही खासगी आस्थापनांनी कोकण कृषी विद्यापिठाशी करार केला आहे, अशी माहिती शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिली.

१. रत्नागिरी-८ बी ही भाताच्या सुवर्णा जातीला पर्याय म्हणून कृषी विद्यापिठाने ही जात विकसित केली.

२. रत्नागिरी- ८ या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे १३५-१४० दिवसांत तयार होणारी असून, मध्यम बारीक दाणा आहे. चवीला उत्तम आहे. कापणी वेळेवर केली, तर अखंड तांदूळ अधिक होऊन तांदूळतुटीचे प्रमाण खूपच अल्प येते. मध्यम उंचीचे असल्यामुळे लोळत नाही. करपा किंवा कडा करपा रोगास प्रतिकारक असून वेळेवर पेरणी आणि लावणी केल्यास किडीला अल्प बळ पडते.

३. आजकालच्या पालटत्या हवामानामुळे योग्य असणारी ही जात आहे.

४. मागील २ वर्षे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमधील प्रत्येक तालुक्यात या बियाण्यांची लागवड करण्यात आली होती. गत खरीप २०२२ या हंगामात या जातीचे ३५ टन बियाणे या २ जिल्ह्यांत रत्नागिरी आणि फोंडाघाट केंद्रावरून विक्री करण्यात आली होते.

५. रत्नागिरी-८ या भात जातीचे बियाणे मोठ्या प्रमाणावर तयार करून अन्य बारीक दाण्याची जात असून, १ सहस्र दाण्यांचे वजन १६ ते १७ ग्रॅम एवढे आहे. तिचे विद्यापीठ स्तरावर सरारी उत्पन्न ५५ ते ६० क्विंटल प्रती हेक्टरएवढे असले, तरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही शेतकर्‍यांनी ८५ ते ९० क्विंटल प्रती हेक्टरएवढे उत्पन्न घेतले आहे.

६. ज्या शेतकर्‍यांना हे बियाणे हवे आहे, त्यांनी कृषी संशोधन केंद्र, शिरगाव येथील अधिकार्‍यांशी संपर्क साधावा.