राज्यातील १ सहस्र अवैध मजारींवर कारवाई करणार ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

(मजारी म्हणजे मुसलमान फकिरांची थडगी)

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी (डावीकडे)

डेहराडून (उत्तराखंड) – भूमी जिहादी असो किंवा मजार जिहाद, देवभूमी उत्तराखंडमध्ये कायद्याच्या विरोधात कोणतेही काम होऊ देणार नाही. आम्ही राज्यातील १ सहस्र ठिकाणांचे सर्वेक्षण केले आहे. या ठिकाणी अतिक्रमण करून मजारी बांधण्यात आल्या आहेत. जर संबंधितांनी येत्या ६ मासांत त्या स्वतःहून हटवल्या नाहीत, तर सरकार त्या मजारींवर कारवाई करील, अशी चेतावणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दिली.

राज्यात सरकारी भूमींवर अवैधरित्या मजारी बांधण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले. सरकारने अशा अवैध मजारींची सूची बनवली आहे. गेल्या २० वर्षांत या मजारी बांधण्यात आल्याचे समोर आले आहे. या मजारींपैकी काहींवर कारवाई केली असता त्यांच्या खाली कोणतेही मानवी अवशेष सापडले नाहीत. याचा अर्थ त्या खोट्या मजारी असून केवळ भूमी हडपण्यासाठीच त्या बांधण्यात आल्याचे उघड झाले आहे. डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या काळात ४१ अवैध मजारी सरकारकडून उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

  • इतक्या मोठ्या प्रमाणात मजारी बांधली जाईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असलेल्यांवरही कठोर कारवाई करा !
  • जर एका राज्यात इतक्या अवैध मजारी असतील, तर संपूर्ण देशात किती असतील, याची कल्पना करता येत नाही  ! अशा सर्व अवैध मजारींवर कारवाई कधी होणार ?