चिपळूण येथे सकल हिंदु समाजाची पोलीस उपअधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी !
चिपळूण ५ एप्रिल (वार्ता.) – देशभरात मुसलमान युवकांनी ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु युवतींना धर्मांतरित केल्याच्या आणि नंतर युवतींचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ करून त्यांची हत्या केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. मुसलमान कुटुंबाने छळ केल्याची तक्रार एका पीडित हिंदु युवतीने चिपळूण पोलीस ठाण्यात २४ मार्च या दिवशी प्रविष्ट केली होती. या पीडित हिंदु युवतीचा सदर मुसलमान कुटुंबातील एका युवकाशी विवाह झालेला आहे. पीडितेने केलेल्या तक्रारीविषयीची माहिती मिळताच ‘संबंधित आरोपींवर योग्य कारवाई करा’, अशा मागणीचे निवेदन ५ एप्रिल या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक सचिन बारी यांना देण्यात आले. या वेळी चिपळूणचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे हेही उपस्थित होते. या वेळी सकल हिंदु समाजाच्या शिष्टमंडळात मनसेचे तालुकाप्रमुख अभिनव भुरण, युवा सेनेचे तालुकाप्रमुख निहार कोवळे, खेर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनोद भुरण, उद्योजक अमित जोशी, विक्रम जोशी, हिंदुत्वनिष्ठ ओंकार नलावडे, हिंदु जनजागृती समितीचे सुरेश शिंदे उपस्थित होते.
पीडित युवतीने मारहाण आणि छळ केल्याविषयी अधिक पुरावे सादर केल्यास तशा प्रकारे कारवाई केली जाईल ! – पोलीस उपअधीक्षक सचिन बारी
‘तूर्तास मारहाणीसाठी वापरलेल्या वस्तू आम्ही जप्त केलेल्या आहेत. त्याआधारे पीडितेचा पती मसूद रज्जाक शाह याला अटक करण्यात आली आहे. रकमेच्या देवाण-घेवाणविषयी अधिक तपशीलवार माहिती घेतली जात आहे. या दांपत्याची मुले अल्पवयीन असल्याने राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या आदेशाने ती मुले त्यांच्या हिंदु युवतीकडे (मुलांच्या आईकडे) सोपवण्याची प्रक्रिया आयोगाच्या निर्देशांनुसार होईल. त्या दृष्टीने प्रक्रिया चालू आहे. आम्ही पतीला जामीन मिळू नये, यासाठी आम्ही आमची बाजू मांडली आहे, शेवटी त्यावर न्यायालयच निर्णय घेईल. पीडित युवतीने मारहाण आणि छळ केल्याविषयी अधिक पुरावे सादर केल्यास तशा प्रकारे कारवाई केली जाईल’, असे पोलीस उपअधीक्षक सचिन बारी यांनी सकल हिंदु समाजाच्या शिष्टमंडळाला सांगितले.
देशभरात हिंदु युवतींचे ‘लव्ह जिहाद’द्वारे होत असलेले शोषण थांबावे आणि हिंदु युवती अन् पालक यांना याची दाहकता समजावी, यासाठी सकल हिंदु समाज अशा विषयांची नोंद घेत आहे. ‘शासनानेही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा त्वरित संमत करावा’ अशी मागणी सर्वत्र होत आहे.
हिंदु युवतीकडे मुले सोपवण्याला मुसलमान कुटुंबियांचा विरोध !
राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या आदेशानुसार हिंदु युवतीच्या मुलांना पुढील प्रक्रियेसाठी रत्नागिरी येथे नेण्यात आले. याकरताही मुसलमान कुटुंबियांनी विरोध केल्याचे हिंदु युवतीच्या कुटुंबियांनी सांगितले. पोलिसांनी यांनी यात हस्तक्षेप करून हे प्रकरण सोडवले.
कुटुंबातील अन्य सदस्यांवर कारवाई का नाही ? – हिंदूंचा पोलिसांना प्रश्न
या वेळी मुसलमान कुटुंबियांनी हिंदु युवतीस जातीवाचक अपशब्द वापरले. तसा गुन्हा नोंद असतांनाही पती वगळता अन्य कुटुंबातील अन्य आरोपींवर वेळेत कारवाई का झाली नाही ?, असा प्रश्नही सकल हिंदु समाजाच्या शिष्टमंडळाने उपअधीक्षक बारी यांना विचारला.
१० एप्रिलला पुढील सुनावणी४ एप्रिल या दिवशी आरोपी मसूद रज्जाक शाह याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. दोन्ही पक्षाच्या अधिवक्त्यांनी युक्तीवाद केला. यावर पुढील सुनावणी आता १० एप्रिल या दिवशी होणार आहे. |