लव्ह जिहादच्या विरोधात हिंदूंनी हतबलता सोडून संघटित आणि कृतीशील होणे आवश्यक !

हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून धर्मप्रसाराचे कार्य करत असतांना हे लक्षात आले की, हिंदूबहुल देशात हिंदूंवर जे अनेक आघात होत आहेत, त्यातील लव्ह जिहाद हा एक आहे. यासंदर्भात लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या युवतींशी बोलण्याचा अथवा त्यांच्या पालकांना भेटण्याचा प्रसंग अनेक वेळा आला. या वेळी जे विदारक सत्य समोर आले, ते म्हणजे या स्थितीत हिंदु पालक अत्यंत हतबल झालेले आढळून आले अन् या हतबलतेमुळे ते या आघाताला सामोरे जाण्याचे सामर्थ्यच घालवून बसले आहेत कि काय ? असे वाटायला लागले; म्हणून हा लेखप्रपंच. यातून कुणाला ४ गोष्टी शिकवायचा हेतू नसून स्वतःचे सामर्थ्य ओळखून आपण निश्‍चित लव्ह जिहादरूपी राक्षसाचे मर्दन करू शकतो, हा विश्‍वास निर्माण करणे, हा प्रामाणिक उद्देश आहे.

१. स्वतःच्या मुलीविषयी गाफील न रहाता सतर्क रहायला हवे !

श्री. प्रशांत जुवेकर

एका प्रसंगात पुष्कळ मोठ्या व्यापार्‍याची शिकलेली मुलगी लव्ह जिहादमध्ये अडकली होती. ती युवती आणि धर्मांध एकमेकांना जवळपास ५ वर्षे ओळखत होते. आरंभी त्या पालकांनी धर्मांधाला समज देण्याचा प्रयत्नही केला आणि यापुढे असे होणार नाही, या विचाराने ते गाफील राहिले. पुढे युवतीला शिक्षणासाठी अन्य शहरात पाठवले आणि एक दिवस त्या पालकांना कळले की, त्यांची मुलगी अजूनही त्या धर्मांधांच्या संपर्कात आहे. यातून एक भाग लक्षात आला की, पालक केवळ वरवरचा आणि तात्पुरता उपाय काढण्याचा विचार करतात. लव्ह जिहादी हा कधीही शांत बसत नाही. त्याने ठरवलेले सावज (हिंदु महिला वा युवती) मिळवण्याचा तो सतत प्रयत्न करत असतो आणि या कामी त्याला त्याचे धर्मबांधव सर्वतोपरी साहाय्य करत असतात. त्यामुळे माझ्या मुलीने मला शपथ देऊन सांगितले आहे की, मी त्याला पुन्हा भेटणार नाही, असे म्हणून यावर विश्‍वास ठेऊन गाफील रहायला नको. यापेक्षा आपण सतर्क राहून स्वतःच्या मुलीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.

२. घरातील वातावरण धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करावा !

आजकाल बर्‍याच घरांमध्ये पाश्‍चात्त्य विकृतीचे अंधानुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. लहानपणापासून हिंदु पालक त्यांच्या युवतींना विदेशी पद्धतीचे घट्ट अथवा शरीरप्रदर्शन करणारे कपडे घालण्यास देतात. काही ठिकाणी चित्रपट पाहून युवती हट्ट करते; म्हणून तिला असे कपडे आणून दिले जातात. युवतींना कपाळावर कुंकू लावण्यासही पालक सांगत नाहीत. ती युवती शाळेत असल्यापासून कपाळ मोकळे ठेवून जाण्यास प्रारंभ करते. विदेशी आचरण, विदेशी आहार, शाळा-महाविद्यालयात साजरे करण्यात येणारे विविध निरर्थक डे यांमुळे हिंदु युवती धर्माचरण, हिंदु संस्कृती यांपासून कोसो दूर जाते. अशी विदेशी आचरणामुळे दुर्बल आणि जर्जर झालेली हिंदु युवती लव्ह जिहादला सहज बळी पडू शकते. येथे लक्षात घ्यायला हवे की, जोवर ती धर्माचरणाच्या लक्ष्मणरेषेच्या आत आहे, तोवर तिला कुणी लव्ह जिहादी त्रास देऊ शकणार नाही. त्यासाठी हिंदु पालकांनी घरातील वातावरण धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न प्रकर्षाने करायला हवा.

३. धर्माचरणामुळे प्रतिकूल प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ प्राप्त होते !

मुले वा मुली यांची केवळ आवड सांभाळत बसू नका, तर त्यांना आवश्यक ते बाळकडूही पाजले पाहिजे. कितीही दुखले, तरी आपण बाळाला आवश्यक ते लसीकरण करतो ना ? कारण ते न केल्यास पुढे काय दुष्परिणाम होतील ? याविषयी आपण जागरूक असतो. तसेच धर्मशिक्षणाचा डोस न दिल्यास पुढे या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. हा भाग लक्षात घेऊन आपण आवडत नसले तरीही आवश्यक आहे; म्हणून धर्मशिक्षण द्यायलाच हवे आणि धर्माचरण करण्यासाठी आग्रही रहायला हवे. धर्माचरणामुळे मिळालेले सामर्थ्य अशा प्रतिकूल प्रसंगात हिंदु युवतीला वा महिलेला नक्कीच सामोरे जाण्याचे बळ देईल.

४. पीडित महिलांनी लव्ह जिहादविरोधी संघटना काढल्याचे ऐकले आहे का ?

अ‍ॅसिड (आम्ल) फेकल्याने पीडित झालेल्या युवतींच्या संघटना आहेत, नवर्‍याने सोडून दिलेल्या (घटस्फोटीत) महिलांचा सांभाळ करणार्‍या अनेक सामाजिक संघटना आहेत; पण लव्ह जिहादमध्ये बळी पडलेल्या पालकांनी अथवा त्याचा जाच सोसलेल्या हिंदु युवतींनी अशी एखादी लव्ह जिहादविरोधी संघटना काढल्याचे ऐकिवात आहे का ? अशी संघटना का काढू शकत नाही ? ज्यांनी या राक्षसाचा त्रास सहन केला आहे, त्यांनी इतरांना जागृत करण्यासाठी म्हणा वा शासनावर अशा घटनांविषयी कठोर नियम बनवण्याच्या दृष्टीने म्हणा, सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करायला हवेत. यामुळे किमान अन्य हिंदु युवती आणि महिला तरी सावध होतील. या दृष्टीने प्रयत्न करणे, ही आजची आवश्यकता आहे.

५. लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासह त्याच्या प्रभावी कार्यवाहीसाठी संघटितपणा हवा !

संपूर्ण देशात लव्ह जिहादचा राक्षस धुमाकूळ घालत असतांना केवळ काही राज्यांत त्या विरोधात कायदा सिद्ध केला गेला. अन्य राज्ये अजूनही याकडे गांभीर्याने पहात नाहीत. त्या राज्यातील शासनकर्त्यांमध्ये याचे गांभीर्य आणणार
कोण ? महाराष्ट्रातही लवकरच हा कायदा आणण्याचे आश्‍वासन विद्यमान शासनाने दिले आहे; पण सगळेच प्रश्‍न कायद्याने थांबत नसतात. महाराष्ट्रात गुटखाबंदी कायदा, गोवंश हत्या बंदी कायदा, असे अनेक कायदे कागदावर आहेत. त्याची प्रभावी कार्यवाही करण्यास प्रशासनाला भाग पाडावे लागते. लव्ह जिहादचा कायदा प्रभावी आणि कठोरपणे कार्यवाहीत आणण्यासाठी हिंदूंनी तो कायदा आल्यावर नीट समजून घ्यायला हवा. तसेच वेळोवेळी संघटित होऊन प्रशासन आणि प्रसंगी शासन यांच्यावर दबाव निर्माण करावा लागेल. याचीही सिद्धता आपण करायला हवी.

६. विद्यमान शासन लव्ह जिहाद्यांचा चौरंगा करणार का ?

हिंदु संस्कृती जसे विनय, भूतदया शिकवते, तसेच लढाऊ वृत्तीही शिकवते. रामायण आम्हाला काय शिकवते ? तर ज्याने सीतामातेला बंदी करून ठेवले त्या रावणाच्या लंकेत वैध मार्गाने शिरून त्याचा वध केला, त्याची लंका जाळण्यात आली. पुढे महाभारतात तर द्रौपदीची अवहेलना करणार्‍या आणि ती पहाणार्‍यांना युद्धात कसे नेस्तनाबूत करण्यात आले, हे आपण जाणतो. छत्रपती शिवरायांनीही हिंदवी स्वराज्यात महिलांच्या रक्षणार्थ कठोर कायदे केले होते. महिलेवर हात टाकणार्‍याचा चौरंगा केला जायचा. श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे करणार्‍या आणि त्याविषयी यत्किंचितही पश्‍चात्ताप नसलेल्या त्या लव्ह जिहाद्याचा विद्यमान शासनाने चौरंगा केल्यास पुढे कुणी लव्ह जिहाद करण्यास धजावणार नाही. यासाठी हिंदु पालकांनी हतबलता सोडून संघटित होण्यासह लव्ह जिहादच्या राक्षसाच्या विरोधात सज्ज व्हावे ! यासाठी आई भवानी आपल्या सर्वांना सामर्थ्य प्रदान करो, अशी प्रार्थना !

– श्री. प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव. (५.३.२०२३)

हिंदु युवतींनी धर्माचरण करून सुसंस्कारित होणे, हाच लव्ह जिहादपासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे !