दक्ष रहा ! पाळत ठेवा !
मुंबई – मला धर्मांध हिंदु नको, धर्माभिमानी हिंदु हवा; जो स्वतःचा धर्म बघेल आणि दुसर्या धर्माचाही मान राखेल; पण जेवढास तेवढा. आज जावेद अख्तर यांच्यासारखे पाकमध्ये जाऊन त्यांना खडे बोल सुनावणारे, घटना मानणारे मुसलमान मला अपेक्षित आहेत. दक्ष रहा, बेसावध राहू नका. आजूबाजूला काय घडत आहे, यावर पाळत ठेवा. आज बेसावध राहिलात, तर पायाखालची भूमी निसटून जाईल. सांगलीत, महाराष्ट्रात अनधिकृत गोष्टी उभ्या रहात आहेत, त्याकडे लक्ष द्या. शासनावर अंकुश ठेवा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील सभेत केले. गुढीपाडव्याच्या दिवशी ही सभा पार पडली. ‘येणारी रामनवमी जोरात साजरी करा’, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
..दोनपैकी एक निर्णय घ्यावाच लागेल !
‘औरंगजेबाच्या कबरीभोवतीचे अनधिकृत बांधकाम तोडले यासाठी मी सरकारचे अभिनंदन करतो’, असे सांगून ते म्हणाले, ‘‘१७ सहस्र मनसैनिकांवरील गुन्हे मागे घ्या’, असे आवाहन मी सरकारला करतो. ‘तुम्ही सांगा की ध्वनीक्षेपक बंद करा’ किंवा ‘आमच्याकडे दुर्लक्ष करा, आम्ही ध्वनीक्षेपक बंद करतो. दोनपैकी एक निर्णय घ्यावाच लागेल. मी विषय सोडणार नाही. मी यासाठी मुख्यमंत्र्यांना परत भेटणार आहे.’’
माहीमच्या समुद्रातील अनधिकृत दर्गा तोडण्याचे आवाहन !
मुंबईच्या माहीम येथे २ वर्षांत समुद्रात उभ्या राहिलेल्या अनधिकृत दर्ग्याचा व्हिडिओ दाखवून प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस कमिशनर, महापालिका आयुक्त यांना राज ठाकरे यांनी आवाहन केले, ‘‘हे बांधकाम मासभराच्या आत तोडले गेले नाही, तर त्याच्या बाजूला सर्वांत मोठे गणपतीचे मंदिर उभे केल्याशिवाय रहाणार नाही. जर कुणालाही सवलती देऊन दुर्लक्ष कराल, तर आमच्याकडेही दुर्लक्ष करा. डोळ्यांदेखत सर्व गोष्टी घडत आहे. तुमची ताकद सतत दाखवावी लागेल.’’
‘दिवसा ढवळ्या अनधिकृत बांधकामे उभी करायची ? सुज्ञ मुसलमान समाजाला हे मान्य आहे का ?’, असा प्रश्नही त्यांनी या वेळी केला.
‘हे राज्य हातामध्ये आले, तर सर्व राज्य सुतासारखे सरळ करून ठेवीन’, असे सूचक विधानही राज ठाकरे यांनी भाषणाच्या अखेरीस केले.
६ जूनला शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. मी रायगडावर जाणार आहे, तुम्ही सगळेही या, असेही आवाहन त्यांनी उपस्थित मनसैनिकांना या वेळी केले.