दुकाने आणि घरे यांच्यासमोर ढोल-ताशे वाजवून नोटीस !
नवी मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मालमत्ता करवसुलीच्या धडक कारवाईला प्रारंभ करण्यात आला आहे. यामध्ये मालमत्ता ‘सील’ करणे, नळजोडणी खंडित करणे, मालमत्ताधारकाचे दुकान किंवा घर यांसमोर ढोल-ताशे वाजवून नोटीस देणे आणि कर वसूल करणे अशी कारवाई शहरात चालू करण्यात आली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत ४९५ कोटी रुपये कर वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिली. महापालिकेच्या या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
सीबीडी, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, दिघा या सर्व विभाग कार्यालयांच्या क्षेत्रातील थकबाकीदारांवर ही कारवाई चालू करण्यात आली आहे. यानुसार एका बड्या व्यावसायिकाच्या तुर्भे सेक्टर १९ मधील एका मॉलला ‘सील’ करण्यात आले आहे. संबंधित बांधकाम व्यवसायिकाच्या १५ गाळ्यांवर कारवाई करत त्याच्या इतरही मालमत्ता सील केल्या आहेत. त्यांचा एकूण २१ कोटी २५ लाख रुपये मालमता कर थकित आहे. याविषयी त्यांना वारंवार नोटिसा पाठवून कर भरण्यासाठी सूट घोषित करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. अशीच कारवाई संपूर्ण शहरात चालू करण्यात आली आहे.
शहरात एकूण ३ लाख ३० सहस्र मालमत्ता आहेत. त्यांपैकी सहस्रो थकबाकीच्या भरण्यासाठीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
या वर्षीचे मालमत्ता करवसुलीचे एकूण उद्दिष्ट ५७५ कोटी रुपये आहे. त्यांपैकी अद्यापपर्यंत ४९५ कोटी रुपये वसूल झाले. या ४९५ कोटी रुपयांमध्ये ५० लाखांच्या वरील १०९ थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडून १४६ कोटी रुपये वसूल करणे अपेक्षित त्यांपैकी अभय योजनेत २५ कोटी रुपये वसूल झाले होत; मात्र ही वसुली अल्प असल्याने १ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या सहस्रो मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.