प्रखर लढाऊ वृत्तीचा मार्ग अवलंबणारे बाबाराव सावरकर !

आज १६ मार्च २०२३ क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांचा ७८ वा स्‍मृतीदिन आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या चरणी विनम्र अभिवादन !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे वडील बंधू बाबाराव सावरकर ! बाबारावांनी आपल्‍या लहान भावाला गुरु मानले. लहान भावाचा अनुयायी होण्‍यात त्‍यांना कमीपणा वाटला नाही. आपल्‍या भावाचा सशस्‍त्र क्रांतीचा मार्ग सुकर व्‍हावा; म्‍हणून वाट्याला आलेल्‍या हालअपेष्‍टा, यातना, दुःख, संकटे, छळ यांना ते आनंदाने सामोरे गेले. स्‍वातंत्र्यवीर विदेशात गेल्‍यावर हिंदुस्‍थानातील कार्याचा भार बाबाराव यांनी सांभाळला.

१. स्‍वराष्‍ट्र आणि स्‍वधर्म यांना प्राधान्‍य देणारे बाबाराव सावरकर !

म. गांधी यांच्‍या राजकीय विचारांच्‍या गोंधळात सापडलेल्‍या हिंदू समाजाला दिशा देण्‍याचा प्रयत्न बाबाराव यांनी केला. मुसलमानांचा अनुनय हा राष्‍ट्रहिताला मारक ठरत होता. ‘अफगाणिस्‍तानच्‍या अमीराला हिंदुस्‍थानवर स्‍वारी करण्‍यासाठी गांधींनी निमंत्रण देण्‍याचा घाट घातला आहे’, हे कळताच बाबाराव यांनी त्‍याला कडाडून विरोध केला. स्‍वराष्‍ट्र आणि स्‍वधर्म यांपेक्षा कोणतीही व्‍यक्‍ती महान नाही. महान व्‍यक्‍तीच्‍या चुकांवर पांघरूण घालून तिचा उदो उदो करणारी आंधळी व्‍यक्‍तीपूजा करण्‍याचा वेडेपणा बाबाराव यांनी केला नाही आणि इतरांना करू दिला नाही.

श्री. दुर्गेश परुळकर

२. स्‍वतःतील विविध गुणांची प्रचीती देत राष्‍ट्राभिमान जपणारे बाबाराव !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या तुलनेत बाबाराव यांचे विचार आणि आचार अधिक जहाल वाटतात. बाबाराव यांची भाषाही वीर सावरकर यांच्‍या ज्‍येष्‍ठ भावाची प्रचीती पटवणारी आहे. बाबाराव साध्‍या सरळ स्‍वभावाचे होते. त्‍यांचा प्रांजळपणा हा गुण वाखाणण्‍याजोगा होता. त्‍यासह अवघड प्रसंगात त्‍यांनी दाखवलेले चातुर्य आणि त्‍यावर सहज केलेली मात त्‍यांच्‍यातील नेतृत्‍वगुणाची प्रचीती देते. राष्‍ट्र-धर्माला बाधा आणणारी व्‍यक्‍ती, तत्त्वे यांचा समाचार घेतांना त्‍यांच्‍यातील कठोरता प्रचितीला येते. इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, याकडे बाबाराव यांचा कटाक्ष होता. श्रीराम, श्रीकृष्‍ण, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्षात्रतेजाने तळपणारे पूर्वज यांचाच मार्ग बाबाराव यांनी अनुसरला होता. पौरुषत्‍व, आत्‍मसन्‍मान आणि राष्‍ट्राभिमान यांची परंपरा अखेरच्‍या श्‍वासापर्यंत बाबाराव यांनी जीवापाड जपली.

३. शस्‍त्रपूजक बाबाराव !

बाबाराव यांचा पिंड क्रांतीकारकाचा होता. त्‍यांनी वर्ष १९२२ नंतर हातात लेखणी घेतली. त्‍या आधी आणि त्‍यानंतरही त्‍यांनी बाँब, पिस्‍तूल या शस्‍त्रांना अंतर दिले नाही. औरंगजेबाच्‍या मशिदीवर आक्रमण करायला तरुणांना उद्युक्‍त करणारे बाबारावच होते. रेल्‍वेगाडीत अरेरावी करणार्‍या पठाणाची दाढी उपटणारे बाबाराव सावरकरच होते. आजारी असतांनाही नागपूरच्‍या मिरवणुकीत हातात शस्‍त्र घेऊन सहभागी होणारे सुद्धा बाबारावच होते.

४. बाबाराव यांनी देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी इंग्रजांचा छळ सहन करणे

अंदमान येथे आणि अन्‍य कारागृहात बाबाराव सावरकर यांचा जेवढा छळ करण्‍यात आला, तेवढा छळ अन्‍य कोणत्‍याही क्रांतीकारकांचा करण्‍यात आला नाही. बाबाराव यांना सातत्‍याने विजेचा शॉक देण्‍यात येत होता; पण कोणत्‍याही छळाला कंटाळून त्‍यांनी आपला देश स्‍वातंत्र्याचा सशस्‍त्र क्रांतीचा मार्ग सोडला नाही. अशा या भारतमातेच्‍या वीरपुत्राचे १६ मार्च १९४५ या दिवशी निधन झाले. त्‍यांच्‍या स्‍मृतीदिनी विनम्र अभिवादन !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (ऑक्‍टोबर २०२२)