‘ज्योतिषशास्त्र हे काळाचे (दैवाचे) स्वरूप जाणण्याचे शास्त्र आहे. जीवनात येणार्या विविध समस्यांच्या संदर्भात ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेतले जाते. ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेण्यासंदर्भात कोणती सूत्रे लक्षात घ्यावीत, हे पुढील लेखाद्वारे समजून घेऊया.
१. ज्योतिषाला आपली नेमकी समस्या सांगणे आवश्यक असणे
काही वेळा जातक (प्रश्न विचारणारी व्यक्ती) त्यांच्या समस्या संदिग्ध स्वरूपात ज्योतिषाला सांगतात, उदा. ‘माझे जीवन पुष्कळ अस्थिर आहे’, ‘माझ्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी आहेत’, ‘माझी मानसिक स्थिती चांगली नाही’ इत्यादी. अशा प्रश्नांवर नेमकेपणाने दिशादर्शन करता येत नाही. जातक जेवढ्या नेमकेपणाने त्याची अडचण सांगेल, तेवढे त्याला योग्य दिशादर्शन करता येते. काही जण त्यांची विशिष्ट समस्या न सांगता ‘माझ्या कुंडलीत काय दिसते ? ते सांगा’, असे म्हणतात. अशाने जातकाला उपयुक्त मार्गदर्शन मिळू शकत नाही; कारण आपल्या जीवनात अनंत गोष्टी असतात.
२. समस्येच्या निवारणासाठी ‘धार्मिक विधी सांगणे’, हे ज्योतिषशास्त्राचे मुख्य कार्य नसणे
काही जण त्यांच्या समस्या दूर होण्यासाठी ‘कोणता धार्मिक विधी करायला हवा ?’, हे विचारण्यासाठी ज्योतिषाकडे जातात. ‘धार्मिक विधी सांगणे’, हे ज्योतिषशास्त्राचे मुख्य कार्य नाही; कारण आपल्या जीवनातील समस्या या पूर्वजन्मांतील अयोग्य कर्मांमुळे निर्माण झालेल्या असतात. धार्मिक विधी केल्याने समस्येची तीव्रता काही काळापुरती अल्प होते; मात्र समस्या कायमची सुटत नाही. ज्योतिषशास्त्र हे मुख्यतः कालज्ञानाचे शास्त्र आहे. ज्योतिषाकडे गेल्यावर ज्या गोष्टीसंबंधी आपल्याला समस्या आहे, त्या गोष्टीविषयी ‘प्रारब्धात काय परिस्थिती आहे ? आणि आगामी काळ कसा असेल ?’, हे प्रामुख्याने जाणून घ्यावे, उदा. एखाद्याचा विवाह जुळून येत नसेल, तर ‘जन्मकुंडलीत विवाहसौख्य कसे आहे ?’, ‘जोडीदाराचा परिचय कोणत्या माध्यमातून होईल ?’, ‘विवाहासाठी अनुकूल योग कधी आहे ?’, इत्यादी गोष्टी जाणून घ्याव्यात. विवाह न जुळण्यामागे आध्यात्मिक स्वरूपाची कारणे असल्यास साहाय्यक उपाय म्हणून धार्मिक विधीचा विचार करावा.
३. एका समस्येसाठी अनेक ज्योतिषांकडे जाणे टाळावे
काही वेळा जन्मकुंडलीद्वारे मिळणारे उत्तर जातकाच्या मनाविरुद्ध असते. अशा वेळी काही जातक त्यांना हवे असलेले उत्तर मिळेपर्यंत अनेक ज्योतिषांकडे जाऊन त्यांचे मार्गदर्शन घेतात. असे केल्याने जातक वस्तूस्थितीपासून दूर रहातो. ज्या ज्योतिषाशी आपला पूर्वपरिचय असून त्याच्यावर विश्वास आहे, अशाच ज्योतिषाचे मार्गदर्शन घ्यावे.
४. एका ज्योतिषाने सांगितलेले दैवी उपाय योग्य आहेत का ? हे दुसर्या ज्योतिषाला विचारणे अयोग्य असणे
काही जातक एका ज्योतिषाने समस्येच्या निवारणासाठी सांगितलेले दैवी उपाय योग्य आहेत का ? हे दुसर्या ज्योतिषाला विचारतात. असे करणे, म्हणजे एका वैद्याने सांगितलेले औषध आणि त्याची मात्रा योग्य आहे का ? हे दुसर्या वैद्याला विचारण्यासारखे आहे. ज्योतिषशास्त्र हे पूर्णपणे भौतिक स्वरूपाचे विज्ञान नाही. ते दैवाशी (प्रारब्धाशी) संबंधित शास्त्र आहे. धर्मशास्त्रात एकाच समस्येवर अनेक दैवी उपाय सांगिलेले असतात, तसेच संबंधित ज्योतिषाची प्रकृती, अभ्यास, अनुभव आणि साधना यांनुसार उपायांमध्ये विविधता असते. त्यामुळे एका ज्योतिषाने सांगितलेले दैवी उपाय योग्य आहेत का ? हे दुसर्या ज्योतिषाला विचारणे टाळावे.
५. लहान-लहान गोष्टींसाठी ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेणे टाळावे
काही जण लहान-लहान गोष्टींसाठी ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेतात, उदा. ‘परीक्षेत उत्तीर्ण होईन का ?’, ‘अमुक सरकारी काम होईल का ?’, ‘अमुक काम मला मिळेल का ?’ इत्यादी. अशाने व्यक्ती दैववादी होण्याचा धोका निर्माण होतो. प्रारब्ध हे जीवनातील एक तथ्य असले, तरी धर्माने प्रयत्नांनाच महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे जीवनातील महत्त्वाच्या घटना किंवा समस्या यांच्या संदर्भातच ज्योतिषशास्त्राचे मार्गदर्शन घेणे उपयुक्त आहे.’
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.२.२०२३)
वाचकांना निवेदनज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन करणार्या ज्योतिषांविषयी आपल्याला आलेले चांगले-वाईट अनुभव आम्हाला पुढील टपालाचा पत्ता किंवा ई-मेल पत्ता यांवर कळवावे.
टपालासाठी पत्ता : श्री. आशिष सावंत, द्वारा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’, भगवतीकृपा अपार्टमेंट्स, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१
ई-मेल : [email protected]
|