पर्रा येथे दंगल घडवल्याच्या प्रकरणी नायजेरियाच्या ४ नागरिकांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका

पणजी – पर्रा येथे रस्त्यावर हैदोस घालून दंगल केल्याच्या वर्ष २०१३ मधील प्रकरणात नायजेरियाच्या ४ नागरिकांची म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. पर्रा येथे ओबोडो उझोमा सायमन या नायजेरियाच्या नागरिकाची हत्या झाली होती. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०१३ या दिवशी नायजेरियाच्या काही नागरिकांनी पोलिसांच्या कार्यात हस्तक्षेप करत या ठिकाणी रस्त्यावर हैदोस घातला. त्या वेळी संडे ओन्ये लकी, मवाचुकवू एल्ग्वेडिम्मे, अराइन्झे उकेमोझी आणि इफेनिल पास्कोल या ४ नागरिकांना पोलिसांनी कह्यात घेतले होते. या ४ नागरिकांना संशयाचा लाभ देऊन निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

त्याचबरोबर जे खटल्याला सामोरे गेले नाहीत, त्या नायजेरियाच्या १५ आरोपी नागरिकांच्या विरुद्ध न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. नायजेरियाच्या अंदाजे ३० नागरिकांनी अवैधरित्या जमाव जमवून पोलीस अधिकार्‍यांना त्यांचे कर्तव्य बजावतांना अडथळा आणला, पोलीस अधिकार्‍यांना शिवीगाळ केली, ओबोडो उझोमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथे नेणारी शववाहिनी अडवून मृतदेह बाहेर काढला होता.

पोलीस कुठे अल्प पडले ?

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी अन्वेषण करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांकडून या दोषी नागरिकांची ओळख परेड करण्यात आली नाही, तसेच दोषी असलेल्यांची माहिती पडताळून पहाण्यात आली नाही. जर हे नायजेरियाचे नागरिक पोलिसांचा कामात अडथळा आणत होते, तर त्यांना अटक करण्यास पोलिसांना कुणी प्रतिबंध केला होता ? असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, अन्वेषण करणार्‍या अधिकार्‍याने नायजेरियाच्या २० नागरिकांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या तक्रारीमध्ये असलेली त्यांची नावे कागदपत्रे घेऊन पडताळली नसल्याने, ही नावे योग्य आहेत, याची निश्चिती नव्हती, तसेच या नागरिकांकडे कोणती धोकादायक हत्यारे होती ?, ते साक्षीदारांनी सांगितले नाही.

संपादकीय भूमिका

विदेशातील नागरिक गोव्यात येऊन दंगल माजवू शकतात, हे पोलिसांना लज्जास्पद आहेच; पण त्याचसमवेत पुराव्याअभावी ते निर्दाेष सुटणे, हे पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे !