रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार आणि रामभक्त पू. सदानंद भस्मे महाराज यांचा देहत्याग !

पू. सदानंद भस्मे महाराज

रामपूर (कर्नाटक) – येथील कीर्तनकार आणि रामभक्त सदानंद भस्मे महाराज यांनी २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी वयाच्या ८२ व्या वर्षी शिवानंद कुटीर येथे देहत्याग केला. २३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते कुबकड्डी (विजयपूर, कर्नाटक) येथील रंगराव महाराज यांचे शिष्य होते. कर्नाटकातील बेंगळुरू आणि शिमोग्गा यांसह गोवा राज्यातील अनेक भागांत त्यांचे भक्त आहेत.

पू. सदानंद भस्मे महाराज यांचा परिचय

रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार पू. सदानंद भस्मे महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे अंतरंगी भक्त होते. संत तुकाराम महाराज यांनी सूक्ष्मातून दिलेल्या ज्ञानाद्वारे पू. भस्मे महाराजांनी ६ वर्षांत ‘तुकाराम चैतन्य’ नावाचा कन्नड भाषेतील ग्रंथ लिहिला. पू. भस्मे महाराज यांना स्वामी रंगराव महाराज गुरु म्हणून लाभले. त्यांच्या अंगी मृदंग, तबला, संवादिनी आदी वाजवण्याची कला उपजतच आहेत. गुरूंनी सांगितल्यानुसार पू. भस्मे महाराज श्रीरामनामाचा अखंड जप करत, तसेच ते गावोगावी दासबोधासह अन्य आध्यात्मिक विषयांवर प्रवचनेही करत. त्यांनी त्यांच्या शिष्यांसमवेत श्रीरामनामाचा ३० सहस्र कोटी जप केला होता.

सत्संगासाठी पू. भस्मे महाराजांनी त्यांचा देहत्याग पुढे ढकलला ! – शिष्य शिवानंद

पू. भस्मे महाराज यांचे एक शिष्य शिवानंद म्हणाले, ‘‘देहत्यागाच्या एक आठवड्यापूर्वी पू. भस्मे महाराज हे रुग्णालयात असतांना ते उडुपी येथील एका सत्संगाविषयी ‘सत्संग कसा झाला ?’, असे सातत्याने विचारत होते. हा सत्संग झाल्यानंतर त्यांनी देहत्याग केला. यावरून ‘महाराजांनी या सत्संगासाठीच त्यांचा देहत्याग पुढे ढकलला’, असे वाटते.’’

सनातनने पू, भस्मे महाराज यांना वर्ष २०२० मध्ये घोषित केले होते संत !

पू. सदानंद भस्मे महाराज यांच्यातील दैवी गुण हेरून सनातनने त्यांना २५ नोव्हेंबर २०२० या दिवशी ‘संत’ घोषित केले. सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात हा सोहळा पार पडला. या वेळी प.पू. दास महाराज यांनी त्यांचा सन्मान केला होता.