स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या एका नामफलकाची दुरवस्‍था, तर दुसरा फलकच गायब !

सरस्‍वती चित्रमंदिराशेजारी दुरवस्‍थेत असलेला स्‍वातंत्र्यवीर सावरकर नामफलक

कोल्‍हापूर, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – कोल्‍हापूर शहरात सरस्‍वती चित्रमंदिराशेजारी असलेल्‍या स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या नामफलकाची दुरवस्‍था झाली आहे, तसेच हा फलक अतिक्रमणाच्‍या गर्तेत सापडला आहे. बिनखांबी गणेशमंदिर ते मिरजकर तिकटी या मार्गावर बसवण्‍यात आलेला दुसरा फलकच गायब करण्‍यात आला आहे. याविषयी सावरकरप्रेमींमध्‍ये तीव्र संताप असून महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्‍यामुळे हा प्रकार होत असल्‍याची प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली जात आहे.

१. या संदर्भात भाजपचे संघटक आणि हिंदु युवा प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष श्री. अशोक देसाई म्‍हणाले, ‘‘वर्ष १९८७ मध्‍ये मी हिंदु एकता आंदोलनाचा शहराध्‍यक्ष होतो. त्‍या वेळी आम्‍ही सर्व कट्टर स्‍वावरकरप्रेमींनी एकत्र येऊन महापालिकेचा पाठपुरावा करून पहिला फलक सरस्‍वती चित्रमंदिराशेजारी बसवला होता, तर दुसरा बिनखांबी गणेशमंदिर येथे बसवला होता. सरस्‍वती चित्रमंदिर येथील जागा स्‍वातंत्र्यवीर स्‍मारकासाठीही प्रस्‍तावित आहे; मात्र हा परिसर सध्‍या अतिक्रमणाच्‍या विळख्‍यात आहे. २६ फेब्रुवारीला असलेल्‍या स्‍वातंत्र्यवीर सावरकर आत्‍मार्पणदिनाच्‍या अगोदर महापालिकेचे फलक दुरुस्‍त न केल्‍यास आम्‍हाला आंदोलन करावे लागेल.’’

२. स्‍वातंत्र्यवीर सावरकर साहित्‍य आणि विज्ञान मंडळाचे सदस्‍य श्री. मालोजी केरकर म्‍हणाले, ‘‘या संदर्भात गेले काही दिवस आम्‍ही मागणी करूनही महापालिका प्रशासन कोणतीच कृती करतांना दिसत नाही. स्‍वातंत्र्यासाठी कारागृहवास पत्‍करणार्‍या स्‍वातंत्र्यवीरांच्‍या फलकाची दुरवस्‍था महापालिका प्रशासन कधी दूर करणार ?’’

संपादकीय भूमिका 

दायित्‍वशून्‍य महापालिका प्रशासन !