पुणे – पूर्व पुणे आणि पश्चिम पुण्याला जोडण्याकरता मुळा-मुठा नदीवर अनेक पूल आहेत; पण हे पूल, उड्डाणपुल सुरक्षित आहेत का ? याची पडताळणी महपालिकेच्या प्रकल्प विभागाकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत ४४ पुलांपैकी ३५ पुलांची पडताळणी पूर्ण झाली आहे. याचा अहवाल मार्चमध्ये मिळणार असून त्यातून शहरातील पुलांची स्थिती कशी आहे, हे समजणार आहे. महापालिकेने १० वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (बांधकाम तपासणी) करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात ५९ पुलांपैकी ४४ पूल हे १० वर्षांपूर्वी बांधलेले आहेत. त्यातच हडपसर येथे १५ वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाला तडे गेले आहेत. त्याची दुरुस्ती करावी लागत आहे. त्यामुळे सर्वच पुलांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित आंबेकर म्हणाले की, शहरातील १० वर्षांपेक्षा अधिक जुने पूल आणि उड्डाणपुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ केले जात आहेत. बर्यापैकी हे काम संपत आले आहे. मार्चमध्ये अहवाल आल्यानंतर ज्या ठिकाणी दुरुस्ती आवश्यक आहे, त्याची दुरुस्ती केली जाईल.