पुणे येथील चि. अभिराम कुलकर्णी याला आंतरशालेय ‘मनाचे श्‍लोक’ पाठांतर स्‍पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्‍त !

चि. अभिरामला मिळालेले प्रशस्‍तीपत्रक आणि पुरस्‍कार

पुणे – ‘समर्थ भारत अभियान’ आणि ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्‍ट, पुणे’ आयोजित आंतरशालेय ‘मनाचे श्‍लोक’ पाठांतर स्‍पर्धेत ३५० विद्यार्थ्‍यांमधून सनातनचा बालसाधक ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा चि. अभिराम हृषिकेश कुलकर्णी (वय ४ वर्षे) याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्‍त झाले आहे. तो पुणे येथील अभिनव विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेत शिकतो. चि. अभिराम हा सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांचा नातू आहे.

चि. अभिरामने या स्‍पर्धेत मनाचे १२ श्‍लोक न अडखळता म्‍हटले. ध्‍वनीवर्धक नसतांनाही अभिरामने सर्वांसमोर खणखणीत आवाजात मनाचे श्‍लोक म्‍हटले. श्‍लोक म्‍हणतांना उच्‍चार, आवाजातील लय हे सर्व अतिशय उत्‍कृष्‍ट असल्‍याविषयी सर्व परीक्षकांनी त्‍याचे पुष्‍कळ कौतुक केले. अभिरामने श्रीकृष्‍णाला प्रार्थना करून मनाच्‍या श्‍लोकांचे पाठांतर केले होते.