‘बीबीसी’कडून महिला आतंकवाद्याविषयी सहानुभूती दर्शवणारा माहितीपट प्रसारित !

  • वादग्रस्त ‘बीबीसी’ला आता आतंकवादी शमीमा बेगम हिचा पुळका !

  • ब्रिटनमधील नागरिकांचा विरोध : ‘बीबीसी’वर बहिष्कार घालण्याची सिद्धता !

डावीकडे शमीमा बेगम

लंडन (ब्रिटन) – वादग्रस्त ‘बीबीसी’कडून गुजरात दंगलीवर आधारित ‘इंडिया – द मोदी क्वेश्चन’, हा भारतद्वेषी माहितीपट प्रसारित झाल्यानंतर आता त्याच बीबीसीला इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेमध्ये भरती होण्यासाठी ब्रिटनमधून सीरियाला पळून गेलेली शमीमा बेगम हिचा पुळका आला आहे. बीबीसीने तिच्या जीवनावर आधारित ‘द शमीमा बेगम स्टोरी’ हा माहितीपट प्रसारित केला आहे.

शमीमा ही वर्ष २०१५ मध्ये, म्हणजे वयाच्या १५व्या वर्षी तिच्या २ मैत्रिणींसह ब्रिटनमधून पळून जाऊन सीरियातील इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेत सहभागी झाली होती. सीरियात असतांना तिला ‘जिहादी ब्राईड’ (जिहादी वधू) या नावाने ओळखले जात होते. तिचा ‘संघर्ष’ सांगण्याचा तिचा प्रयत्न या माहितीपटात करण्यात आला आहे. ९० मिनिटांच्या या माहितीपटात तिचा सीरियापर्यंतचा प्रवास कसा होता ? त्यातून बाहेर पडण्याचा तिच्या संघर्ष कसा होता ? आदींविषयी माहिती देऊन ‘सीरियामध्ये जाण्याच्या निर्णयाचे शमीमाला दुःख वाटत असून त्याचा तिला पश्चाताप होत आहे’, असेही या माहितीपटात चित्रित करण्यात आले आहे.

इस्लामिक स्टेट संघटनेत सक्रीय झाल्यानंतर ब्रिटनने शमीमाचे नागरिकत्व रहित केले होते. शमीमाचे कुटुंब मूळचे बांगलादेशी असून ते ब्रिटनचे नागरिक आहेत.

ब्रिटनमधील नागरिकांकडून बीबीसीवर बहिष्कार घालण्याची सिद्धता !

या माहितीपटास ब्रिटनने कडाडून विरोध केला आहे. ‘बीबीसीचा हा माहितीपट म्हणजे शमीमाविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे’, असा आरोप ब्रिटनमधील नागरिकांनी केला आहे. ‘बीबीसी’ हे माध्यम आस्थापन मूळचे ब्रिटनमधील आहे. त्यामुळे आता स्वतःच्याच देशात बीबीसीला मोठा विरोध होत आहे.

ब्रिटनमधील अनेक नागरिकांनी बीबीसीवर बहिष्कार घालण्यासाठी बाह्या सरसावल्या आहेत. ‘शमीमा बेगमला तिच्या कृत्याविषयी जराही पश्चाताप झालेला आम्हाला दिसला नाही, मग ‘बीबीसी’कडून तिच्याविषयी सहानुभूती का निर्माण केली जात आहे  ?’, असा प्रश्न तेथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

(म्हणे) ‘आतंकवादी संघटनेत सहभागी झाल्याचा मला पश्चाताप !’ – शमीमा

याविषयी बीबीसीशी बोलतांना शमीमा बेगम म्हणाली, ‘‘आतंकवादी संघटनेत सहभागी झाल्याचा मला पश्चाताप होत आहे. (यावर कोण विश्वास ठेवणार ? – संपादक) मी आतंकवादाच्या विरोधात ब्रिटनला साहाय्य करू इच्छिते. माझे उदाहरण समाजाला उपयोगी ठरू शकते.’’

संपादकीय भूमिका

  • आशा बीबीसीवर आता जगभरात बंदी आणली जाण्यासाठी भारताने पुढकार घेणे आवश्यक आहे !
  • भारत आणि हिंदू यांचा सातत्याने अपमान करणार्‍या बीबीसीवर भारतातील नागरिकांनीही ब्रिटनमधील नागरिकांप्रमाणे बहिष्कार घालण्याचा रोखठोक बाणा अंगीकारणे अपेक्षित आहे !