महान भारतीय संस्‍कृती !

अनुष्‍का सुनक

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची ९ वर्षांची कन्‍या अनुष्‍का सुनक हिने भारताविषयी सांगतांना ‘येथे घर, कुटुंब, संस्‍कृती सर्वकाही आहे; म्‍हणून मी भारतात येणे पसंत करते’, असे म्‍हटले आहे. भारताचे महत्त्व भारतियांपेक्षा विदेशातील व्‍यक्‍तींना जाणवत आहे, ही खेदाची गोष्‍ट आहे. तिने केलेला भारतीय संस्‍कृतीचा गौरव हा प्रत्‍येक भारतियाची मान उंचावणारा आहे; परंतु ही सत्‍य गोष्‍ट आजची तरुणाई विसरली आहे, असे वाटते. किती भारतियांना असा अभिमान आहे, हा संशोधनाचा विषय होईल.

विदेशामध्‍ये जन्‍म घेतलेल्‍या आणि ९ वर्षे विदेशामधील संस्‍कृतीमध्‍ये वाढलेल्‍या ९ वर्षांच्या अनुष्‍काला जे समजले ते सर्व भारतियांना विचार करायला लावणारे आहे. एकेकाळी भारत हा ‘विश्‍वगुरु’ होता. तो विश्‍वगुरु पदावर राहू न शकण्‍यामध्‍ये भारतीय सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांचा वाटा अधिक आहे, असेच म्‍हणावे लागेल. भारताला निधर्मी राष्‍ट्र घोषित करून याद्वारे महान हिंदु धर्मापासून भारतियांची नाळ तोडण्‍याचा प्रयत्न झाला. ‘विश्‍वगुरु’ भारतामध्‍ये काय वेगळेपण आहे, याचा विचार केल्‍यास भारतीय संस्‍कृती असेच म्‍हणावे लागेल.

अनुष्‍का सुनक हिला भारतीय पारंपरिक नृत्‍याची आवड आहे. तिला कुचिपुडी हा नृत्‍य प्रकार आवडतो. याविषयी ती सांगते, नृत्‍यामुळे सर्व चिंता आणि तणाव दूर होतात. हाही पालट अत्‍यंत महत्त्वाचा आहे. भारतीय संस्‍कृतीमध्‍ये ‘कले’च्‍या माध्‍यमातून ईश्‍वरप्राप्‍ती कशी करायची ? हे सांगितले आहे. चित्रकला, नृत्‍यकला यांसारख्‍या १४ विद्या आणि ६४ कला यांच्‍या माध्‍यमातून भगवंताला म्‍हणजेच सच्‍चिदानंद अवस्‍था प्राप्‍त करू शकतो. याचे ज्ञान नसल्‍यामुळे तरुणाई पॉप म्‍युझिक, तसेच विदेशी नृत्‍य प्रकार यांच्‍या मागे लागत आहे.

ज्‍या ब्रिटिशांनी भारतावर राज्‍य केले आणि ‘dogs and Indians were not allowed (कुत्रे आणि भारतीय यांना प्रवेश निषिद्ध)’ अशी मानसिकता असणार्‍या ब्रिटिशांवर भारतीय वंशाच्‍या व्‍यक्‍तीने राज्‍य करावे किंवा तेथील व्‍यवस्‍था आपल्‍या हातात घ्‍यावी, हे भारतीय संस्‍कृतीचे यशच म्‍हणावे लागेल. यातून भारतीय संस्‍कृती आणि परंपरा सर्वश्रेष्‍ठ आहेत. त्‍यांच्‍यात वैश्‍विक नेतृत्‍व करण्‍याची क्षमता आहे; म्‍हणून ‘विश्‍वगुरु’ बनण्‍याचे स्‍वप्‍न पहाणार्‍या प्रत्‍येक भारतियाने आपल्‍या संस्‍कृतीशी नाळ घट्ट ठेवणे, तसेच आपल्‍या परंपरा जपणे, हे अपरिहार्य आहे. असे केल्‍यानेच आपली ऐहिक आणि पारमार्थिक उन्‍नती होऊन राष्‍ट्राची प्रगती होईल.

– श्री. जयेश बोरसे, पुणे