विद्यार्थ्‍यांनी मनामध्‍ये देशभक्‍ती, राष्‍ट्रभक्‍ती जागवावी ! – शरद पोंक्षे, अभिनेते

शरद पोंक्षे

सांगली – आजच्‍या युगात विद्यार्थ्‍यांना उत्तम यश मिळत आहे, असे शैक्षणिक टक्‍केवारी पाहिली तर लक्षात येते. विद्यार्थ्‍यांना मोठमोठे ‘पॅकेजेस’ दिले जात आहेत; परंतु राष्‍ट्ररक्षण, संरक्षण दल अशा मार्गांचा विद्यार्थी अवलंब करतांना दिसत नाहीत. त्‍यामुळेच विद्यार्थ्‍यांनी देशभक्‍ती, राष्‍ट्रभक्‍ती मनामध्‍ये जागवली पाहिजे, असे आवाहन स्‍वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी आणि चित्रपट अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले. ते विश्रामबाग येथील ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्‍ठान’च्‍या वतीने सावरकर आत्‍मार्पणदिनाच्‍या निमित्ताने आयोजित व्‍याख्‍यानमालेत बोलत होते.

श्री. शरद पोंक्षे पुढे म्‍हणाले, ‘‘देश महासत्तेच्‍या दिशेने वाटचाल करत आहे; मात्र स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या दृष्‍टीकोनातून प्राधान्‍याने देशाच्‍या सीमा सुरक्षित हव्‍यात. अद्ययावत् शस्‍त्रसाठा आपल्‍या देशाकडे हवा, तसेच तीनही सुरक्षा दलांना सर्व सुविधा मिळायला हव्‍यात, असे सावरकरांचे नेहमीच देशाला सांगणे होते. त्‍यामुळे स्‍वातंत्र्यवीरांचे केवळ पुतळे उभारून चालणार नाही, तर त्‍यांचे राष्‍ट्रजागृतीविषयक जाज्‍ज्‍वल्‍य दृष्‍टीकोन देश आणि जग यांना तारतील.’’

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्‍ट्रजागृतीविषयक दृष्‍टीकोन आत्‍मसात करणे हेच खरे राष्‍ट्रकर्तव्‍य ठरेल !