सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या माध्यमातून पंचतत्त्वांचे संवर्धन आणि लोकजागृती ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

मठाच्या ६५० एकरांत सिद्धता आणि ३० लाख लोकांच्या सहभागाची अपेक्षा !

‘सुमंगलम’ महोत्सवासाठी सिद्ध करण्यात आलेले बोधचिन्ह

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – मानवाच्या अयोग्य जीवनशैलीने जागतिक पातळीवर पर्यावरणाची प्रचंड मोठी हानी होत आहे. ओझोनचा थर अल्प होत आहे. वाढत्या तापमानामुळे हिमखंड, ग्लेशियर वितळत आहेत. यामुळे भविष्यात करोडो हेक्टर भूमी पाण्याखाली जाईल. अनेक ठिकाणी पाण्याचा अतीवापर चालू आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचतत्त्वांचे संवर्धन महत्त्वाचे आहे. त्यासाठीच २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान’च्या वतीने सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित केला आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देतांना डॉ. संदीप पाटील (उभे असलेले), तसेच प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी (डावीकडून तिसरे), तसेच अन्य

मठाच्या ६५० एकरांत होणार्‍या या लोकोत्सवात भारत, तसेच अन्य देश यांतील ३० लाख लोक सहभागी होतील, अशी माहिती ‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान’चे प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी ३ फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत दिली. प्रास्ताविक डॉ. संदीप पाटील यांनी केले.

पत्रकार परिषदेत माहिती देतांना प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी (डावीकडून तिसरे), तसेच अन्य

प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी पुढे म्हणाले की,

१. ६४ कला आणि १६ संस्कार यांची माहिती देणार्‍या प्रतिकृती येथे उभारण्यात येत आहेत. आदर्श गुरुकुल कसे असावे ? अशा ५०० प्रतिकृती (मूर्ती) येथे उभारण्यात येत आहेत.

महोत्सवाच्या ठिकाणी गुरुकुल शिक्षण पद्धतीची माहिती देणाऱ्या प्रतिकृती
महोत्सवाच्या ठिकाणी प्राचीन परंपरेची माहिती देणारी उभारलेली प्रतिकृती
महोत्सवाच्या ठिकाणी शंखनाद शिकवणार्‍या परंपरेची माहिती देणारी उभारलेली प्रतिकृती
महोत्सवाच्या ठिकाणी विविध प्रकारच्या वादन कला कशा शिकवल्या जात होत्या ? याची माहिती देणारी उभारलेली प्रतिकृती
महोत्सवाच्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीत सूर्यनमस्कार कशाप्रकारे शिकवला जात होत होता ? याची माहिती देणारी उभारलेली प्रतिकृती

२. पंचतत्त्वांची माहिती देणारे दालन येथे उभारण्यात येणार असून प्रत्येक तत्त्व कसे कार्य करते ? आणि त्याच्या र्‍हासामुळे कोणता दुष्परिणाम होतो ? हे या दालनांमध्ये दाखवण्यात येणार आहे.

 

३. विविध प्रकारच्या गायी, म्हैस, बैल, घोडे, देशी कुत्री, गाढव अशा प्रकारच्या प्राण्यांचे प्रदर्शन येथे भरवण्यात येणार असून शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयांची बक्षीसे या माध्यमातून देण्यात येणार आहेत. गाढविणीचे दूध हे अमूल्य असून त्यापासून अनेक रोगांवर औषधे बनवली जातात. सध्या गाढवाच्या प्रजाती लुप्त होत असून त्याचे संवर्धन आवश्यक आहे.

४. या लोकोत्सवात १ सहस्र प्रकारचे विविध प्रदर्शन कक्ष असून यात देशी बियाणे, तृणधान्य यांचे कक्षही असणार आहेत. यातून युवकांना रोजगार, महिलांना कुटिरोद्योग यांची माहिती मिळेल. २ दिवस देशपातळीवरील ५ सहस्र वैद्यांची परिषद भरवली जाणार आहे. यातून वैचारिक मंथन, वैचारिक देवाणघेवाण वाढेल.

५. १० सहस्र लोक येथे राहू शकतील, असे भव्य नियोजन चालू असून प्रतिदिन किमान २ लाख पोळी आणि २ लाख भाकरी यांचे नियोजन आहे. यासाठी मोठ्या संख्येन लोक अर्पणाच्या माध्यमातून साहाय्य करत आहेत.

६. या महोत्सवासाठी १ सहस्र साधू-संत, महंत उपस्थित रहाणार असून पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, ७ राज्यांचे राज्यपाल, ९ राज्याचे मुख्यमंत्री यांसह अनेकांना निमंत्रण देण्यात आले आहे.

१९ फेब्रुवारीला भव्य शोभयात्रा आणि पंचगंगेची आरती !

या महोत्सवाच्या प्रचारासाठी शिवजयंतीच्या औचित्याने १९ फेब्रुवारीला दसरा चौक ते पंचगंगा नदीघाट अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेच्या समारोपप्रसंगी पंचगंगेची आरती करण्यात येईल, तसेच या माध्यमातून पुढे पंचगंगा नदी संवर्धनासाठी कायमस्वरूपी प्रयत्न केले जातील. शोभायात्रेत १५ प्रकारचे वेगवेगळे चित्ररथ, ७० विविध प्रकारांच्या वाद्यांचे प्रकार, तसेच अनेक गोष्टींचा समावेश आहे. ज्या प्रकारे म्हैसूर येथील दसरा महोत्सव भव्य-दिव्य होतो, त्याचप्रकारे शिवजयंतीची मिरवणूक ही भव्य-दिव्य करण्याचा आमचा मानस आहे, असे स्वामीजींनी सांगितले.

गेले ३ मास रात्रंदिवस या महोत्सवाची सिद्धता चालू आहे. ७ दिवस चालणार्‍या या लोकोत्सवात ५० देशांतून, २५ राज्यांतून लोक येणार असून ५०० कुलगुरु उपस्थित असणार आहेत.

१ लाख स्वेअर फूट जागेत मुख्य सभामंडप उभारला जात असून ३ सहस्र लोकांसाठी लेझर, थ्रीडी आणि पंचमहाभूतांवर आधारित चित्रपटगृह उभारण्यात येत आहे.