गोव्याची बाजू कायदेशीरदृष्ट्या भक्कम ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

म्हादई जलवाटप तंटा

पणजी, ३० जानेवारी (वार्ता.) – म्हादई जलवाटप प्रकरणी गोव्याची बाजू कायदेशीरदृष्ट्या भक्कम आहे. याची फलनिष्पत्ती लवकरच दिसून येणार आहे. म्हादईच्या संवर्धनासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगाव येथील निवडणूक प्रचार सभेत ‘केंद्राने गोवा राज्याची संमती घेऊन म्हादईचे पाणी वळवण्यास कर्नाटकला मान्यता दिली’, असे विधान केले होते. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.

केंद्रीय गृहमंत्र्यांचा दावा अमान्य ! – जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

सुभाष शिरोडकर

पणजी – म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटकला संमती देण्याविषयी केंद्राकडे कोणतीच चर्चा झालेली नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हादईसंबंधी केलेले विधान आम्ही स्वीकारत नाही, असे मत जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘म्हादईसंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले विधान आम्ही स्वीकारू शकत नाही; कारण अशा स्वरूपाची कोणतीही चर्चा केंद्राकडे झालेली नाही. म्हादईसंबंधी केंद्राकडे चर्चेच्या वेळी त्यांनी ‘दोन्ही ठिकाणची सरकारे आपलीच आहेत आणि दोन्ही राज्यांची आम्ही काळजी घेऊ’, असे म्हटले होते. केंद्रीय जल आयोगाने कळसा-भंडुरा प्रकल्पाला संमती दिलेली असली, तरी म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटकला अजूनही अनेक खात्यांच्या अनुज्ञप्ती घ्याव्या लागणार आहेत. ही खाती पाणी वळवण्यासाठी मान्यता देणारच नाहीत, असा मला ठाम विश्‍वास आहे.’’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान हे पाटबंधारे प्रकल्पांविषयी ! – नीलेश काब्राल

पणजी – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी केलेली चर्चा म्हादईच्या संवर्धनासाठी होती, म्हादईचे पाणी वळवण्यासाठी नव्हती. म्हादईसंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानाचा मी निषेध करतो. मुख्यमंत्र्यांनी म्हादईचे पाणी वळवण्यासाठी अनुमती देण्याचा प्रश्‍नच येत नाही; कारण अशी चर्चा केंद्राकडे झालेलीच नाही. म्हादईचे पाणी खोर्‍यातून बाहेर नेण्यास आमचा विरोध आहे; मात्र हे पाणी खोर्‍यातच ते वापरत असतील, तर त्यास आमची हरकत नाही. म्हादई पाणी तंटा लवादाने कर्नाटकला पिण्यासाठी पाणी दिलेले आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान हे पाटबंधारे प्रकल्पांविषयीचे आहे.’’

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा