साधकांना साधनेसाठी प्रेरित करणारे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका होऊन ईश्वरप्राप्ती करून घेण्यासाठी थोडे तरी कष्ट भोगावेच लागणार

‘आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या एका साधकाने त्याला होणार्‍या आध्यात्मिक त्रासांमुळे घरी जाण्याचा विचार केला. हे त्याने श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांना सांगितले. तेव्हा त्यांनी त्याला पुढीलप्रमाणे सांगितले, ‘‘तुम्ही (साधकाने) कुठेही राहिलात, तरी आनंदी आणि साधनेत रहावे’, हेच देवाला अपेक्षित आहे. ‘आपण आश्रमात कि घरी रहायचे ?’, हे ज्याचे त्याने ठरवावे. जीवनात प्रत्येकाला काही चांगले मिळवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. व्यवहारातही नेहमीचे जीवन जगण्यासाठी मनुष्याला अतोनात संघर्ष करावा लागतो. आपल्याला तर जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून आपली सुटका करून घेऊन ईश्वरप्राप्ती करून घ्यायची आहे, मग थोडे तरी कष्ट भोगावेच लागणारच.

२. घरी राहून आणि आश्रमात राहून साधना करण्यातील भेद

२ अ. घरी राहिल्याने होणार्‍या संघर्षामुळे मनाला असह्य वेदना अन् दुःख होणे; पण तोच संघर्ष आश्रमातील दैवी वातावरणात आणि संतांच्या छत्रछायेत सुसह्य होणे : ज्यांना शक्य आहे त्यांनी आश्रमात राहून साधना केल्यास, त्याचा त्यांना आध्यात्मिक लाभ अधिक करून घेता येऊ शकतो. घरी बसून प्रार्थना करणे आणि तीच कृती एका मंदिरात जाऊन करणे, यांत किती भेद (फरक) असतो ना ! स्वतःच्या मनाने औषध घेणे अन् तेच एका वैद्यांकडून सल्ला घेऊन घेणे, यांत किती भेद आहे !

इतकेच नव्हे, तर आश्रमात राहून संतांच्या सत्संगात साधना करण्याचे लाभही तेवढेच अधिक आहेत. जो संघर्ष घरी राहून मनाला असह्य वेदना आणि दुःख देतो, तोच संघर्ष आश्रमात राहून येथील दैवी वातावरणात आणि संतांच्या छत्रछायेत सुसह्य होतो.

२ आ. गुरूंच्या छत्राखाली आपले प्रारब्धभोग जलद फिटण्यास साहाय्य होते.

२ इ. आश्रमातील दैवी ऊर्जेने आपले त्रास आणि दुखणे आपल्या नकळत आपोआपच अल्प होत जातात.

२ ई. आश्रमातील साधकही आपल्या अडचणींमध्ये आपल्याला साहाय्य करण्यास नेहमी तत्पर असतात.

३. ईश्वरी कार्यात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलण्याचे जे महद्भाग्य साधकांना गुरुकृपेने लाभले आहे, त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला, तरीही साधना न सोडण्याचा आणि मनुष्यजन्माचे सार्थक करण्याचा दृढ निश्चय साधकांनी करणे आवश्यक असणे

सध्या काळाची गरज पहाता राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करून साधना करणार्‍यांची अधिक आवश्यकता आहे. ईश्वरी कार्यात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलण्याचे जे महद्भाग्य गुरुकृपेने आपल्याला लाभले आहे, त्याची संधी साधकांनी कदापि सोडू नये. साधकांनी ‘कितीही अडचणी आल्या, कष्ट झाले किंवा संघर्ष करावा लागला; तरीही मी साधना सोडणार नाही. देवाचे चरण सोडणार नाही’, हा दृढ निश्चय मनाशी करण्याची आता वेळ आली आहे. साधकांनी हे सत्य जाणून घ्यावे आणि स्वतःच्या मनावर कोरून घ्यावे की, ‘साधकांचा जन्म हा ईश्वरप्राप्तीसाठी आहे. मायेत रममाण होऊन आयुष्य व्यर्थ घालवण्यासाठी नव्हे.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)