श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या ५२ व्‍या वाढदिवसानिमित्त काढलेल्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या विशेष पुरवणीच्‍या संरचनेची सेवा करतांना साधकाला आलेल्‍या अनुभूती

‘७.१२.२०२२ या दिवशी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या ५२ व्‍या वाढदिवसानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’ची विशेष पुरवणी काढण्‍याचे नियोजन केले होते. प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेने मला त्‍या अंकाच्‍या संरचनेची सेवा करण्‍याची संधी मिळाली. ती सेवा करतांना मला आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. पनवेलहून गोवा येथे जातांना रेल्‍वे प्रवासात झालेला सर्दीचा त्रास रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात पोचल्‍यावर उणावणे

मला धूळ आणि थंड वारा यांची ‘अ‍ॅलर्जी’ आहे. पनवेल येथे थंडी अधिक असल्‍याने गोवा येथे जाण्‍याच्‍या दिवशी सकाळी मला पुष्‍कळ सर्दी झाली होती. रेल्‍वेमध्‍ये पुष्‍कळ धूळ असल्‍याने माझी सर्दी वाढली आणि नंतर माझा घसा दुखू लागला. मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात पोचल्‍यावर औषधे आणि अर्धा दिवस विश्रांती घेतल्‍याने मला बरे वाटले अन् मी सेवेला आरंभ केला.

२. प्रार्थना केल्‍यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या विशेष पुरवणीच्‍या पानांची संरचना सहजतेने आणि गतीने होणे

श्री. सागर गरुड

दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या विशेष पुरवणीतील लिखाणाच्‍या संरचनेची सेवा मी प्रथमच करत होतो. मी रामनाथी आश्रमात आल्‍यापासून ‘प.पू. डॉक्‍टर आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना अपेक्षित अशीच विशेष पुरवणीची सेवा मला करता येऊ दे’, अशी माझ्‍याकडून सतत प्रार्थना होत होती. त्‍यामुळे माझ्‍याकडून पुरवणीच्‍या पानांची संरचना सहजतेने आणि गतीने होत होती. मला ‘संरचनेत कसे करू ?’, हे बुद्धीने लक्षात येत नसल्‍यास मी प्रार्थना करत असे. तेव्‍हा देव मला त्‍याविषयी लगेच सुचवत होता.

३. संरचनेची सेवा सलग ८ दिवस करत असतांना आनंद मिळणे आणि साधकांनी सांगितलेल्‍या सुधारणा सहजतेनेे स्‍वीकारता येणे

मी संरचनेची सेवा सलग ८ दिवस करत होतो. आतापर्यंत मी अशी सेवा केली नव्‍हती. मला या विशेष अंकाच्‍या पुरवणीसंबंधी सेवा करतांना आनंद होत होता. मला सेवेत कुणी सुधारणा सांगितल्‍यास मला त्‍या सहजतेने स्‍वीकारता येत होत्‍या. ‘साधकांनी सुधारणा सांगितल्‍याने माझी होणारी चूक टळली आणि मला शिकायला मिळाले’, असे मला वाटत होते.

४. संरचनेच्‍या सेवेतून चैतन्‍य मिळाल्‍याने ‘झोपायला न जाता आणखी सेवा करावी’, असे वाटणे

संरचनेची सेवा करतांना ‘सेवा करणे थांबवू नये’, असे मला वाटायचे. सेवा करतांना मला भूकेची जाणीवही होत नव्‍हती. हे सर्व ‘सेवेतून मिळत असणार्‍या चैतन्‍यामुळेच झाले’, असे मला वाटते. ‘सेवेतून मिळालेल्‍या चैतन्‍यामुळे मला झोपायला न जाता आणखी सेवा करावी’, असेच वाटत होते.

५. एका संतांनी अंतिम झालेल्‍या पुरवणीची पाने एकदाच पाहूनही सेवा करणार्‍या साधकांच्‍याही लक्षात न आलेल्‍या चुका सांगून अंक सुंदर आणि सात्त्विक होण्‍यास साहाय्‍य करणे अन् त्‍यांच्‍या दिव्‍य दृष्‍टीची प्रचीती येणे

विशेष पुरवणी अंतिम झाल्‍यावर आम्‍ही एका संतांना पुरवणीची पाने दाखवली. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि कला’ यांच्‍याशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी पुरवणी अनेक वेळा पाहूनही त्‍यांना ज्‍या सुधारणा लक्षात आल्‍या नव्‍हत्‍या, अशा अनेक सुधारणा संतांनी पाने एकदाच पाहून सांगितल्‍या. यातून त्‍यांना असलेल्‍या दिव्‍य दृष्‍टीची मला प्रचीती आली, तसेच ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक सुंदर आणि सात्त्विक व्‍हायला हवा’, अशी त्‍यांचीच तळमळ पुष्‍कळ आहे’, हे माझ्‍या लक्षात आले.

प.पू. गुरुमाऊली, आपल्‍या कृपेने मला श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍या वाढदिवसानिमित्त काढलेल्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या विशेष पुरवणीच्‍या संरचनेची सेवा करण्‍याची संधी मिळाली. आपणच ती सेवा माझ्‍याकडून करून घेतली. त्‍या वेळी आपल्‍या कृपेने मला सेवेतील अनेक बारकावे शिकता आले आणि त्‍यातून आनंद मिळाला. प.पू. गुरुमाऊली, आपल्‍या चरणी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरीही ती अल्‍पच आहे.’

– श्री. सागर गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१२.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक