विशाल ढुमे महिला लैंगिक छळाच्या विरोधातील समितीचे उपाध्यक्ष !

  • संभाजीनगर येथील पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी महिलेचा विनयभंग केल्याचे प्रकरण

  • पोलीस ठाण्यातील फलकावरील नाव झाकावे लागले !

  • पोलिसांची नाचक्की !

पोलीस आयुक्त विशाल ढुमे

संभाजीनगर – मद्य पिऊन महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक आणि निलंबित करण्यात आलेले साहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे हे महिला कर्मचार्‍यांच्या लैंगिक छळाच्या विरोधात न्याय मिळवून देणार्‍या ‘विशाखा समिती’चे उपाध्यक्ष असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्यानंतरही ‘विशाखा समिती’च्या फलकावर उपाध्यक्ष म्हणून २ दिवस झळकत असलेले त्यांचे नाव कागदाने झाकण्याची नाचक्की शहर पोलिसांवर आली आहे.

कामाच्या ठिकाणी होणार्‍या महिलांच्या छळाचा प्रतिबंध, संरक्षण आणि निवारण करण्यासाठी वर्ष २०१३ च्या कायद्यानुसार प्रत्येक कार्यालयात ‘विशाखा समित्या’ स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यांच्या सदस्यांची माहिती देणारे फलकही दर्शनी भागात लावण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालयाच्या स्वागतकक्षातच ‘विशाखा समिती’चा फलक आहे. त्यावर असलेले ढुमे यांचे नाव पांढरा कागद चिकटवून झाकून टाकण्यात आले आहे. ढुमे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद होणे, हा पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेवर काळिमा मानला जात आहे.


विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक झाल्यावर ‘विशाखा समिती’च्या उपाध्यक्षपदावरून ढुमे यांना तात्काळ काढून टाकण्यात आले होते. याचे आम्ही स्वागत करतो; मात्र झालेल्या प्रकाराचा निषेध करतो.

– मंगला खिंवसरा, अशासकीय सदस्य, विशाखा समिती